विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील हजारो कुटुंबांची तहान भागवणाऱ्या पापडखिंड धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात छठपूजेच्या वेळी महापालिकेतील लोकप्रतिनिधी, स्वतः आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत भाविकांनी थेट पिण्याच्या पाण्यात उतरून उत्सव साजरा केला. त्यानंतर आता धरणाच्या थेट डोहात दुचाकी आणि रिक्षा नेऊन त्या धुण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत.
नियम धाब्यावर बसवून मूकसंमती?
धरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेनेच नियम धाब्यावर बसवून मूकसंमती दिल्याने धरणाच्या डोहात थेट वाहने नेऊन धुण्याचे प्रकार राजरोसपणे वाढू लागले आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे अस्तित्वात असलेला जलस्रोतच निष्काळजीपणामुळे प्रदूषित होत आहे.
कारवाईची मागणी
सार्वजनिक जलाशयाचे पाणी अशुद्ध करणाऱ्यांविरुद्ध सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे आणि जलस्रोतात प्रदूषित घटक सोडण्यास सक्त मनाई आहे. तरीही लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाण्यात उतरून उत्सव साजरे होत असतील, तर वाहने धुणाऱ्यांवर कारवाई करण्याचे नैतिक धाडस प्रशासन दाखवणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ तत्काळ थांबवून धरणाभोवती कडक सुरक्षाव्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
Leave a Reply