भारतात बाटलीबंद पाणी म्हटले की सर्वात आधी बिसलेरी हेच नाव डोळ्यांसमोर येते. दुकानात पाण्याची बाटली घेताना ब्रँड कोणताही असो, अनेक ग्राहक आजही ‘बिसलेरीच मिळेल का?’ असे विचारतात. १९६९ मध्ये केवळ चार लाख रुपयांना खरेदी केलेली ही कंपनी आज अब्जावधी रुपयांचा ब्रँड बनली आहे. ज्या काळात लोक बाटलीबंद पाणी विकत घेण्याचा विचारही करत नव्हते, त्या काळात बिसलेरीने बाजारपेठ कशी काबीज केली, ही कहाणी तितकीच रंजक आहे.
१८५१ मधील सुरुवात आणि भारतात आगमन
बिसलेरीची स्थापना १८५१ मध्ये इटालियन व्यावसायिक, रसायनशास्त्रज्ञ आणि संशोधक सिग्नर फेलिस बिसलेरी यांनी केली. त्यांनी औषधी वनस्पती, सिंकोना आणि लोह क्षारांपासून एक टॉनिक तयार केले, जे मद्यपानाचे दुष्परिणाम आणि मलेरियावर उपचारासाठी विकले जात होते. फेलिस यांच्या निधनानंतर त्यांचे कौटुंबिक डॉक्टर आणि जवळचे मित्र डॉ. सेझारे रॉसी कंपनीचे मालक झाले. रॉसी यांनी इटलीमध्ये बिसलेरीला बाटलीबंद मिनरल वॉटर ब्रँड म्हणून विकसित केले आणि नंतर ते भारतात आले. भारतात त्यांची भेट वकील खुशरू सुंतूक यांच्याशी झाली. दोघांनी मुंबईतील ठाणे येथे बिसलेरीचा पहिला बॉटलिंग प्लांट उभारला. मात्र सुरुवातीला लोकांना हे पाणी आवडले नाही, कारण त्या वेळी पिण्याच्या पाण्याची कमतरता नव्हती आणि बाटलीबंद पाण्याची फॅशनही नव्हती. त्या काळात हे पाणी फक्त पंचतारांकित हॉटेल्स आणि उच्चभ्रू उपाहारगृहांमध्ये विकले जात होते, त्यामुळे कंपनीला मोठे नुकसान झाले आणि रॉसी व सुंतूक यांनी बिसलेरी विकण्याचा निर्णय घेतला.
रमेश चौहान यांची दूरदृष्टी आणि आजची बाजारपेठ
१९६९ मध्ये पार्ले एक्सपोर्ट्सचे रमेश चौहान यांनी केवळ चार लाख रुपयांना बिसलेरी विकत घेतली. विशेष म्हणजे, पार्लेने बिसलेरी विकत घेतली तेव्हा ते पाणी नसून क्लब सोडा होता. त्यानंतर कंपनीने हळूहळू सर्वसामान्यांसाठी परवडणारे मिनरल वॉटर म्हणून त्याचे विपणन सुरू केले आणि बिसलेरी घराघरात पोहोचली. भारतीय बाजारपेठेत बिसलेरीचा सध्या अंदाजे ३२ ते ३६ टक्के बाजारहिस्सा आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार बिसलेरी, किनले आणि अक्वाफिना हे तीन ब्रँड मिळून भारतातील पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाजारपेठेवर अंदाजे ७१ टक्के नियंत्रण ठेवतात. अनेक नवीन ब्रँड उदयास आले असले तरी विस्तृत वितरण जाळे आणि ब्रँड मूल्यामुळे बिसलेरी बाजारपेठेत अग्रस्थानी आहे.
दरम्यान, बिसलेरीचे नाव सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. अन्न सुरक्षा नियामकाच्या अहवालानुसार, कंपनीच्या गोवा येथील प्लांटमधून घेतलेल्या पाण्याचा नमुना दोनदा चाचणीत अयशस्वी ठरला असून त्यात ब्रोमेट आणि इतर हानिकारक घटक परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळले आहेत. कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यावर स्पष्टीकरण देताना कंपनीने सांगितले की, त्रयस्थ प्रयोगशाळेच्या चाचणीत नमुना पूर्णपणे सुरक्षित आढळला आहे आणि कंपनी नियमांनुसार नियामकांना पूर्ण सहकार्य करत आहे.
Leave a Reply