कोल्हापूर जिल्ह्यापाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातही शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. खानापूर तालुक्यातील माहुली येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या आक्रमक विरोधामुळे मोजणी न करताच रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सकाळी ९ वाजल्यापासून माहुली येथील जमीन मोजणीच्या ठिकाणी शेतकऱ्यांसह तब्बल ८ तास ठिय्या मांडून प्रशासनाची कोंडी केली. यानंतर ८०० पोलिसांचा फौजफाटा आणि अधिकारी निघून गेले.
मोजणीची यंत्रे फोडली, परिसरात तणाव
दिवसभरात उपविभागीय अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अनेकदा मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासनाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर त्यांना नमते घ्यावे लागले. सुपीक जमिनी महामार्गात जात असल्याने नागेवाडी, माहुली आणि भाग्यनगर परिसरातील शेतकरी कमालीचे आक्रमक झाले होते. मोजणीसाठी आलेल्या पथकाकडील मोजणीची यंत्रे संतप्त शेतकऱ्यांनी ताब्यात घेऊन ती जागेवरच फोडून टाकली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मोजणीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आदल्या रात्रीपासूनच शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करत त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र शेतकऱ्यांचा वाढता दबाव आणि आंदोलन पाहता या सर्व पदाधिकाऱ्यांना सायंकाळी उशिरा सोडून देण्यात आले.
संयुक्त मोजणी होऊ न देण्याचा निर्धार
सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाविरोधात वज्रमूठ आवळली असून, कोणत्याही परिस्थितीत संयुक्त मोजणी होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. उद्यापासून जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी प्रशासनाकडून मोजणी करण्याचा प्रयत्न होईल, त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र येऊन तीव्र विरोध करण्याचा निर्णय आंदोलनानंतर घेण्यात आला आहे.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग (नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग) हा महाराष्ट्रातील पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग/गोवा सीमा) दरम्यान नियोजित सहापदरी द्रुतगती महामार्ग आहे. या प्रकल्पाची सुधारित लांबी सुमारे ८५६ किलोमीटर आहे. नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ सुमारे १८ तासांवरून ७ ते ८ तासांवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र या महामार्गाला ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
Leave a Reply