पंढरपूरमध्ये भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला…’ या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि गुलाल-बुक्क्याची मुक्त उधळण अशा भक्तिमय वातावरणात कार्तिकी यात्रेची सांगता झाली.
शेकडो वर्षांची परंपरा
शेकडो वर्षांची परंपरा असलेला महाद्वारकाला सोहळा श्री विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्तिकी यात्रेच्या सांगतेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक महाद्वारकाला सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जाते.
पादुका मंदिरात आणण्याचा सोहळा
परंपरेनुसार, हरिदासांच्या काल्याच्या वाड्यातून मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पागोट्याच्या साहाय्याने श्री पांडुरंगाच्या पादुका बांधण्यात आल्या. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात या पादुका मंदिराकडे नेण्यात आल्या. संत नामदेव पायरीमार्गे या पादुका श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात आणण्यात आल्या. यावेळी वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग घेतला. पादुका सभामंडपात आणल्यानंतर महाद्वारकाला सोहळ्यातील महत्त्वाचा विधी पार पडला.
प्रतिक्रिया व्यक्त करा