धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तिखट-तेलकट पदार्थांचे अतिसेवन यांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. अतिप्रमाणात तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल साचून राहते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे कोणत्याही क्षणी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
एलडीएलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर केवळ घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. आहारात काही फळांचा समावेश केल्यास खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत करणारी फळे
सफरचंद: सफरचंदात असलेल्या फायबरमुळे आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत होते. दैनंदिन आहारात नियमित एक सफरचंद खावे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. सफरचंदमध्ये असलेले पेक्टिन नावाचे विद्राव्य फायबर आतड्यांमधील अनावश्यक घटक बाहेर काढून टाकते.
संत्री: आहारात संत्र्याचा समावेश केल्यास आरोग्य सुधारण्यासोबतच रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते. पचनसंस्थेच्या कार्यासाठी ते महत्त्वाचे असून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर संत्र्याचा रस पितात, पण त्याऐवजी नियमित एक संत्री खावे. विकतच्या संत्र्याच्या रसात अतिरिक्त साखर असलेल्या पॅकबंद ज्यूसचा आहारात समावेश करू नये.
ॲव्होकॅडो: ॲव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात. आहारात लोणी किंवा इतर जास्त सॅच्युरेटेड फॅट खाण्याऐवजी ॲव्होकॅडोचा समावेश करावा. ॲव्होकॅडोमध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे आहारात आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा ॲव्होकॅडोचा समावेश करावा.
यासोबतच जांभूळ आणि केळी यांसारख्या फळांचे सेवन करावे. केळीमध्ये असलेले सोल्युबल फायबर्स शरीरातील एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तसेच यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यास मदत होते.
Leave a Reply