दूरचित्रवाणी विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अंगद हसीजा याला एका विचित्र फोन कॉलचा अनुभव आला आहे. ‘बिदाई’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या अंगदने शार्दुलच्या पॉडकास्टमध्ये हा अनुभव सांगितला. एका इव्हेंटसाठी त्याला फोन आला होता, मात्र इव्हेंटबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नव्हती.
इव्हेंटमध्ये नेमके काय करायचे, नृत्य करायचे का आणि कोणते कपडे घालायचे, असे विचारल्यावर त्याला फक्त ‘प्रायव्हेट इव्हेंट’ असल्याचे सांगण्यात आले. अंगदला वाटले की एखादा कौटुंबिक कार्यक्रम असून कमी लोकांमध्ये इव्हेंट होईल. त्याला १५-१६ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली. त्या काळात कोणत्याही इव्हेंटसाठी इतकी मोठी रक्कम मिळत नव्हती, त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे त्याला जाणवले.
खात्यात पैसे जमा झाल्याचा धक्का
त्या व्यक्तीने वारंवार विचारले की तू हा इव्हेंट करशील का आणि काही अडचण तर येणार नाही ना. हे प्रश्न ऐकून अंगद तणावात आला. त्याने आग्रहाने इव्हेंटचा तपशील मागितला तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले की, सगळ्यांनाच माहीत आहे की तो पेड आहे. हे ऐकून अंगद अवाक झाला.
अंगदने इव्हेंटसाठी नकार देण्यापूर्वीच त्याच्या खात्यात १६ लाख रुपये जमा करण्यात आले. त्याने तात्काळ हे पैसे परत केले आणि इव्हेंट करण्यास नकार दिला. सगळेच कलाकार पेड असतात आणि ही सामान्य गोष्ट असल्याचे त्याला सांगण्यात आले. या फोन कॉलमुळे तो प्रचंड तणावाखाली होता आणि त्याला खूप लाजिरवाणे वाटल्याचे अंगदने सांगितले.
Leave a Reply