दागिने म्हटले की सोनं, चांदी, हिरे किंवा मोती डोळ्यांसमोर येतात. पण टेक्सासमधील एका महिलेने चक्क स्वतःच्या चेहऱ्याच्या हाडांपासून कानातले बनवून घेतले आहेत. या अनोख्या दागिन्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शस्त्रक्रियेतील हाडांचे तुकडे जपून ठेवले
टेक्सासमध्ये राहणाऱ्या ऑब्रे या चाळीशीहून अधिक वयाच्या ट्रान्सजेंडर महिला आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील बदलांच्या प्रवासाचा एक भाग म्हणून चेहऱ्याची फेमिनायझेशन शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेदरम्यान चेहऱ्याच्या हाडांवर आणि मऊ ऊतींवर काही बदल करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांतून हाडांचे काही छोटे तुकडे काढण्यात आले. मात्र ते टाकून देण्याऐवजी ऑब्रे यांनी ते स्वतःकडे ठेवण्याची इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली आणि वैद्यकीय पथकानेही त्यांना परवानगी दिली.
नेकलेस बनवण्याचाही विचार
काही काळानंतर ऑब्रे यांच्या मनात या हाडांच्या तुकड्यांपासून दागिने बनवण्याची कल्पना आली. त्यासाठी त्यांनी रेडिटच्या माध्यमातून एका दागिने डिझायनरशी संपर्क साधला आणि त्या डिझायनरने त्यांच्या कल्पनेला आकार देत हाडांच्या तुकड्यांपासून खास कानातले तयार केले.
ऑब्रे यांनी सोशल मीडियावर या कानातल्यांचे फोटो शेअर करत आपल्याकडे अजून काही हाडांचे तुकडे शिल्लक असल्याचे सांगितले. त्यांच्यापासून पुढे नेकलेस बनवण्याचाही विचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑब्रे यांच्यासाठी हे दागिने केवळ फॅशनची वस्तू नाहीत. स्वतःची ओळख स्वीकारण्याचा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा हा त्यांच्या प्रवासाचा एक भाग आहे.
Leave a Reply