सोशल मीडियावर दररोज असंख्य विनोदी रील्स आणि व्हिडिओ येतात. त्यांच्या शेवटी अनेकदा नाना पाटेकर किंवा खळखळून हसणारा एक मुलगा दिसतो. भारतासह पाकिस्तान आणि युरोपातील रील्समध्येही हा मुलगा हमखास झळकतो. त्याचे नाव अरुण कुमार. तो सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला आहे की तो कायम चर्चेत असतो.
पण जगाला हसवणाऱ्या अरुणचे आयुष्य अजिबात सोपे नव्हते. घरच्या गरिबीमुळे वयाच्या दहाव्या वर्षीच त्याला शाळा सोडावी लागली. चौथीनंतर त्याचे शिक्षण थांबले. त्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो ट्रकवर क्लिनर म्हणून काम करू लागला. ट्रकमध्येच त्याचे बालपण गेले. नेहरू नावाच्या ट्रकचालकासोबत तो काम करत होता.
चहाच्या टपरीवरचा व्हिडिओ ठरला टर्निंग पॉइंट
एके दिवशी चहाच्या टपरीवर विश्रांतीच्या वेळी नेहरू यांनी अरुणचा एक व्हिडिओ चित्रित केला. त्यात चहाचा कप हातात धरलेला अरुण बिनधास्तपणे खळखळून हसताना दिसतो. नेहरू यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. तेव्हापासून अरुण इंटरनेटवर सर्वांचा लाडका बनला.
ट्रकची केबिन झाली वर्गखोली
अरुणच्या व्हिडिओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत होते, पण अर्धवट शिक्षणामुळे त्याला त्या वाचताही येत नव्हत्या. ही अडचण नेहरू यांच्या लक्षात आली. ज्यांनी अरुणला सोशल मीडियावर ओळख मिळवून दिली, त्याच नेहरू यांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांनी त्याच्यासाठी पुस्तके विकत घेतली, परीक्षा शुल्क भरले आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करून घेतली. प्रवासादरम्यानही त्यांनी त्याचा अभ्यास करून घेतला. ट्रकची केबिनच त्याची वर्गखोली बनली.
अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले. मार्च २०२६ मध्ये अरुण दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. आता तो कंटेंट क्रिएटर म्हणून आवश्यक असलेली इतर कौशल्ये आत्मसात करत आहे. अनेक तरुणांसाठी अरुणची कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.
Leave a Reply