मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

घर सोडलेला विद्यार्थी आठ तासांत मित्रांच्या सल्ल्याने परतला

खराडी परिसरातील १६ वर्षीय विद्यार्थी आईला मेसेज करून मध्यरात्री घर सोडून गेला; पोलिसांनी शोध सुरू केला असताना मित्रांच्या सल्ल्याने तो आठ तासांत घरी परतला.

घर सोडलेला विद्यार्थी आठ तासांत मित्रांच्या सल्ल्याने परतला

आईच्या मोबाइलवर ‘घर सोडून जात आहे’ असा संदेश पाठवून १६ वर्षीय मुलाने मध्यरात्री घर सोडले. मुलगा घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर आईने शोधाशोध सुरू केली. तो सापडला नाही, तेव्हा तिने खराडी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. अखेर पोलिसांचे प्रयत्न आणि मित्रांनी दिलेल्या योग्य सल्ल्यामुळे मुलगा आठ तासांत सुखरूप घरी परतला.

देहरादूनला जाण्यास अनुत्सुक

खराडी परिसरात राहणारा हा मुलगा देहरादून येथे इयत्ता अकरावीत शिकत आहे. १२ ऑक्टोबरला वाढदिवसानिमित्त तो पुण्यात घरी आला होता. दिवाळीच्या सुट्टीमुळे त्याचा मुक्काम वाढला. सुट्टी संपल्यानंतर २० नोव्हेंबरला आईने त्याला शाळेत परत जाण्यास सांगितले. मात्र, देहरादूनला जाण्याची त्याची इच्छा नव्हती आणि त्याने नाराजी व्यक्त केली होती.

मध्यरात्री घर सोडले

रविवारी रात्री आई आणि मुलाने एकत्र जेवण केले. त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास मुलगा घरात नसल्याचे आईला दिसले. त्याचा मोबाइलही बंद होता. आईच्या मोबाइलवर ‘मी घर सोडून जात आहे’ असा संदेश आल्याने तिची चिंता वाढली. नातेवाइकांकडे शोध घेतला. मुलगा देहरादूनला पोहोचला आहे का, याचीही माहिती घेतली. मात्र, तो सापडला नाही, त्यामुळे खराडी पोलिसांकडे तक्रार दिली.

मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आईने व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध सुरू केला असतानाच मुलाच्या मित्रांनी त्याला योग्य सल्ला दिला. त्यानंतर त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. आठ तासांत मुलगा सुखरूप घरी परतल्याने आई आणि नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला. तपासात दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा देहरादूनला शाळेत जायचे नसल्याचे समोर आले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance