कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत असून त्यासाठी उभारली जाणारी प्रचंड डेटा सेंटर्स येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईचे कारण ठरू शकतात, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. तंत्रज्ञानात लवकर सुधारणा झाली नाही, तर २०३० पर्यंत अमेरिकेतील डेटा सेंटर्स थंड ठेवण्यासाठी लागणारे पाणी हे देशातील सर्व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याइतके असेल, असे इकोलॅब कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टोफ बेक यांनी स्पष्ट केले आहे.
९५ टक्के केंद्रांमध्ये पाण्याचा मोठा वापर
सध्या कार्यरत असलेल्या ९५ टक्के डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते. चिप तयार करण्यापासून ते ती थंड ठेवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पाण्याची गरज भासते. जुन्या पद्धतीत हवेने थंड करून चिप्सचे तापमान नियंत्रित केले जात होते, मात्र आजच्या शक्तिशाली एआय चिप्ससाठी ती पद्धत पुरेशी नाही. हवेच्या तुलनेत पाणी ३० पटीने अधिक वेगाने उष्णता शोषून घेते. त्यामुळे आता थेट चिपवर थंड पाणी सोडणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे.
टेक्सासमध्ये विरोध, उपाय म्हणून पुनर्वापर तंत्रज्ञान
पाण्याच्या या अतिवापरामुळे अमेरिकेतील टेक्साससारख्या पाणीटंचाई असलेल्या राज्यांत स्थानिक नागरिकांनी डेटा सेंटर्सविरोधात मोठा रोष व्यक्त केला असून, त्याचे पडसाद निवडणुकांमध्येही उमटले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून इकोलॅबने क्लोज्ड लूप आणि कनेक्टेड वॉटर प्रणाली विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे चिप निर्मिती आणि शीतकरणासाठी वापरलेले अत्यंत शुद्ध पाणी पुन्हा स्वच्छ करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. यामुळे नवीन डेटा सेंटर्स वॉटर न्यूट्रल होऊन नैसर्गिक स्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
Leave a Reply