नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेसाठी रविभवन परिसरात ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र यातील २० पेक्षा जास्त कॅमेरे झाडांच्या फांद्यांना खिळे आणि स्क्रू ठोकून लावण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
## सुरक्षेच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन
हिवाळी अधिवेशनासाठी अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधी नागपुरात मुक्काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर काही तरुणांनी हल्ला केला होता. त्यानंतर सर्वच मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर रविभवन परिसरात कॅमेरे लावण्यात आले. मात्र कॅमेरे बसवण्यासाठी झाडांवर खिळे ठोकण्यात आल्याने सुरक्षेच्या नावाखाली कायदाच धाब्यावर बसवला जात असल्याची टीका होत आहे.
## काय सांगतो कायदा?
महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम, १९७५ नुसार झाडांच्या खोडाला खिळे ठोकणे, खोडाभोवती विद्युत माळा, केबल किंवा वायर गुंडाळणे किंवा झाडांना इजा पोहोचवणे बेकायदेशीर आहे. खिळे ठोकल्याने झाडांच्या आरोग्याला इजा पोहोचते. या नियमाचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा प्रत्येक झाडामागे एक हजार रुपये, दुसऱ्यांदा तीन हजार रुपये, तर तिसऱ्यांदा पाच हजार रुपये दंड आकारला जातो. चौथ्यांदा नियमभंग झाल्यास संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना या अधिनियमाच्या कलम २१(१) अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचा अधिकार मिळतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडांवर खिळे ठोकून कॅमेरे लटकवल्याने आता या प्रकरणावर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Leave a Reply