बारामतीतील गोविंद बागेत यंदा शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनाचा नवा टप्पा गाठण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने यंदा तिथे एकरी सरासरी १२० टन ऊस पिकला आहे. गेल्या पंधरा वर्षांत गोविंद बागेत एकरी सरासरी सुमारे ६० टन ऊस येत होता. त्याच्या तुलनेत यंदाचे उत्पादन दुप्पट झाले असून, या प्रयोगाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
देशाचे माजी कृषीमंत्री आणि खासदार शरद पवार यांना शेतीचा दीर्घ अभ्यास आणि अनुभव आहे. बारामतीत ते सातत्याने शेतीत नवे प्रयोग करत आले आहेत. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची सूचना त्यांनी यापूर्वीच केली होती. आता गोविंद बागेत त्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून उत्पादनात मोठी वाढ साधता आली आहे.
हवामानापासून खतांपर्यंत प्रत्येक घटकाचा अभ्यास
शेतीच्या उत्पादनावर बदलते हवामान, पाण्याचे नियोजन, खतांचा संतुलित वापर, पिकांवरील रोग आणि किडींचा प्रादुर्भाव तसेच जमिनीची सुपीकता यांचा मोठा परिणाम होतो. या सर्व घटकांचा अभ्यास करून योग्य वेळी योग्य निर्णय घेता यावा, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ऊस पिकासाठी ही आधुनिक पद्धत अवलंबल्याने उत्पादनात सकारात्मक बदल दिसून आला आहे.
बारामती हा प्रगतशील शेतकऱ्यांचा प्रदेश मानला जातो. इथले शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगांतून नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती फुलवत आहेत. गोविंद बागेतील या यशामुळे ऊस उत्पादनाचा नवा विक्रम रचला गेला आहे.
पाण्याची बचत आणि खर्चावर नियंत्रण शक्य
ऊसशेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्यास पाण्याची बचत होऊ शकते, खतांचा योग्य वापर करता येतो, पीक व्यवस्थापनात अचूकता येते आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवता येते. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती अधिक उत्पादक आणि फायदेशीर होऊ शकते, हे या प्रयोगातून अधोरेखित झाले आहे.
गोविंद बागेतील हा प्रयोग बारामतीसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीची नवी दिशा देणारा ठरू शकतो, असे विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ नीलेश नलावडे यांनी म्हटले आहे.
Leave a Reply