मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

२६ वर्षांत ३३ डीसीपी बदलले, नागपूरची वाहतूक कोंडी कायम

नागपूर शहरात गेल्या २६ वर्षांत ३३ वाहतूक उपायुक्त बदलले, तरी वाहतुकीची कोंडी कायम आहे. शहरात १६ लाख वाहने असताना दिवसभरात केवळ ३५३ कर्मचारी ड्युटीवर असतात.

२६ वर्षांत ३३ डीसीपी बदलले, नागपूरची वाहतूक कोंडी कायम

नागपूर शहरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि वाढते अपघात यांवर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक विभागालाच सध्या स्थिर नेतृत्वाची प्रतीक्षा आहे. गेल्या २६ वर्षांत तब्बल ३३ पोलिस उपायुक्त बदलले असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेतील सातत्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नियोजन एकाचे, अंमलबजावणी दुसऱ्याची

वाहतूक विभागात नव्याने येणारा उपायुक्त आधी शहरातील वाहतुकीचा अभ्यास करतो. त्यानंतर महापालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न होतो. विविध भागांतील अडचणी समजून घेऊन सुधारणा आराखडा तयार केला जातो. मात्र हा आराखडा प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येण्यापूर्वीच बदलीचे आदेश येतात आणि नव्या अधिकाऱ्याला पुन्हा शून्यापासून अभ्यास सुरू करावा लागतो. त्यामुळे सुरू असलेल्या योजनांचे सातत्यही बाधित होते. काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभारही होता.

वाहने १६ लाखांवर, ड्युटीवर केवळ ३५३ कर्मचारी

नागपूर जिल्ह्यात सुमारे ३२ लाख वाहनांची नोंदणी आहे. यातील निम्मी वाहने शहरात असल्याचे गृहीत धरले तरी शहरातील वाहनसंख्या १६ लाखांपर्यंत पोहोचते. दुसरीकडे वाहतूक पोलिस विभागातील मंजूर पदांची संख्या ८४३ इतकीच आहे. ही पदसंख्या २० ते २५ वर्षांपूर्वीच्या परिस्थितीनुसार ठरली होती, तेव्हा शहरात ५ ते ६ लाख वाहने होती. सध्या मंजूर पदांपैकी सुमारे ६०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात एक उपायुक्त, एक सहायक आयुक्त आणि १४ पोलिस निरीक्षक आहेत. मात्र साप्ताहिक सुटी, आजारपणाच्या रजा आणि अन्य कारणांमुळे दररोज सुमारे २० टक्के कर्मचारी अनुपस्थित असतात. रात्रीच्या ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची संख्या वजा केल्यानंतर दिवसभरात वाहतूक नियंत्रणासाठी प्रत्यक्षात केवळ ३५३ कर्मचारी उपलब्ध राहतात.

मध्य प्रदेशासह अन्य राज्यांमधील वाहनेही दररोज शहरातून ये-जा करतात. अशा परिस्थितीत केवळ चौकांमध्ये पोलिस तैनात करणे किंवा नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे पुरेसे ठरत नाही. कोणत्या वेळी कोणत्या मार्गावर वाहनांची गर्दी वाढते, अतिक्रमणामुळे कुठे कोंडी होते आणि सिग्नलची वेळ कुठे बदलायला हवी, याचे विश्लेषण करून उपाययोजना आखाव्या लागतात. या प्रक्रियेला वेळ लागतो. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचा कार्यकाळच अनिश्चित असेल तर नियोजनाला गती मिळणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance