संध्याकाळी कामावरून थकून घरी आल्यानंतर अनेकांना काहीतरी चविष्ट आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकतचे पदार्थ आणण्याऐवजी घरीच रताळ्याचे चाट बनवता येते. रताळ्याची नैसर्गिक गोड चव, लिंबाचा आंबटपणा आणि मसाल्यांचा तिखटपणा यामुळे या चाटची चव अधिक खुलते.
रताळे चवीला अतिशय चविष्ट लागतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सकाळच्या नाश्त्यात रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो. रताळ्यामध्ये कर्बोदके, फायबर आणि बीटा-कॅरोटीनसारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे आहारात रताळ्याचा समावेश करावा.
लागणारे साहित्य
रताळे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळे मीठ, लिंबाचा रस, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव.
बनवण्याची कृती
सर्वप्रथम मध्यम आकारात रताळे कापून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून त्यात रताळे शिजण्यासाठी ठेवा. रताळे जास्त शिजवू नयेत.
शिजवलेले रताळे थंड झाल्यानंतर त्यांची साल काढा आणि मध्यम आकारात तुकडे कापून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिसळा.
या मिश्रणात चवीनुसार मीठ, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला आणि काळे मीठ घाला. त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. तयार चाटवर बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे आणि शेव घालून खाण्यासाठी सर्व्ह करा. झटपट बनवलेले रताळ्याचे चाट तयार आहे. हा पदार्थ घरातील सगळ्यांना खूप आवडेल.
Leave a Reply