पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील माथेरान शहरात नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माथेरान सनियंत्रण समितीला डावलून किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली घरमालकांना परवानग्या दिल्याचा आणि त्याआडून नवीन घरे व हेरिटेज वास्तूंचे नूतनीकरण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
माहिती अधिकारातून उघड झालेले वास्तव
सामाजिक कार्यकर्ते दिगंबर रामचंद्र चंदने यांनी २८ जुलै २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत डिसेंबर २०२३ पासून एमपी व बीपी भूखंडांवर दिलेल्या दुरुस्ती परवानग्या, सनियंत्रण व हेरिटेज समितीचे अहवाल, स्ट्रक्चरल ऑडिट आणि कामापूर्वी व नंतरची छायाचित्रे यांची माहिती मागितली होती. नगरपरिषदेच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या उत्तरात काही परवानग्यांच्या प्रती दिल्या; मात्र अटींची पूर्तता झाल्याचे महत्त्वाचे अभिलेख कार्यालयात उपलब्ध नसल्याचे कळवले.
गार्डन रिसोर्ट, सेक्रेटरी ऑफ मर्चेंट नेव्ही, केकी लॉज, एल्फिन्स्टन लॉज आणि कच्छ कॅसल या मालमत्तांच्या परवानग्यांमध्ये हेरिटेज मंजुरी व स्ट्रक्चरल ऑडिटच्या अटी असतानाही मूळ अभिलेख उपलब्ध नाहीत, असे समोर आले आहे. हेरिटेज समितीचे ठराव, स्थळपाहणी आणि छायाचित्रे कुठे आहेत, याची सखोल पडताळणी व्हावी, अशी मागणी चंदने यांनी केली आहे.
चौकशीचे आदेश
या विसंगतीविरोधात चंदने यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा सहआयुक्तांनी ३ नोव्हेंबर रोजी माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले. नियमोचित चौकशीसह स्वयंस्पष्ट अभिप्रायाचा पूर्तता अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहेत. ऐतिहासिक वारसा व हेरिटेज नियमांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या माथेरानमध्ये या चौकशीतून कोणते सत्य बाहेर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply