राज्यात सध्या थंडीचा जोर काही भागांमध्ये वाढताना पाहायला मिळत आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि चक्रीवादळामुळे बदललेली हवामान स्थिती यामुळे राज्यात थंडी जाणवू लागली आहे. दिवसा उबदार, तर रात्री आणि पहाटे थंड वातावरणाचा अनुभव नागरिकांना मिळत असून, आज सोमवारी राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील अंदाज
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे. दिवसा तापमान वाढलेले असताना रात्री आणि पहाटे वातावरणात गारवा जाणवणार आहे. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असून, किनारपट्टी भागात दमट हवामानासह हलका गारवा अनुभवायला मिळेल.
उत्तर महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे राहणार असून, दुपारी उबदार आणि रात्री थंड वातावरण अनुभवायला मिळेल. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान १३ ते १९ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात २ ते ३ अंशांनी चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने रात्रीच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक जाणवू शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. दिवसा उबदार वातावरण, तर रात्री आणि पहाटे थंड हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तापमानातील चढ-उतार कायम असल्याने सकाळच्या वेळी गारवा जाणवत आहे.
एकंदरीत राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव वाढताना पाहायला मिळत आहे. नागरिकांनी सकाळी आणि रात्री बाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा, तसेच बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घ्यावी.
Leave a Reply