जेवल्यानंतर अनेकदा पोटातून गुडगुड किंवा गुरगुरल्यासारखा आवाज येतो. हा आवाज कधीकधी लाजिरवाणा वाटू शकतो. पचनसंस्थेत अन्न, पाणी आणि वायू पुढे सरकत असताना आतड्यांच्या हालचालींमुळे असा आवाज निर्माण होतो. वैद्यकीय भाषेत या समस्येला बॉर्बोरिग्मी असे म्हणतात.
पोटातून आवाज येण्याची प्रमुख कारणे
भूक लागल्यावर पोटात अन्न नसते, तरीही पचनसंस्थेच्या हालचाली सुरू होतात. पोट आणि आतड्यांमध्ये वायू व द्रव पदार्थांची हालचाल झाल्यामुळे गुडगुडण्याचा आवाज येतो. त्यामुळे भूक लागल्यावर लवकर काहीतरी खाणे योग्य ठरते.
जेवणानंतर पचनाची प्रक्रिया सुरू असतानाही असा आवाज येणे सामान्य आहे. अन्न पचनसंस्थेतून हळूहळू खाली सरकत असताना आतड्यांच्या आकुंचन-प्रसरणामुळे अन्न, पाणी आणि वायू यांची सतत हालचाल होते. डाळी, कडधान्ये, कोबी, फ्लॉवर, कांदा आणि काही दुग्धजन्य पदार्थांमुळे काही जणांना गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे ढेकर येणे, पोटातून आवाज येणे किंवा आंबट पाणी तोंडात आल्यासारखे वाटू शकते.
बद्धकोष्ठताही या आवाजाचे एक कारण असू शकते. सकाळी पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास आतड्यांमध्ये अन्नाचा साठा राहतो. त्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे आणि पोटातून आवाज येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
काय करावे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
वारंवार अपचनाची समस्या असेल तर जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. आहारात फायबर आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करावे. भरपूर पाणी प्यावे, जेवणाच्या नियमित वेळा पाळाव्यात आणि अन्न सावकाश चावून खावे. यामुळे आतड्यांमधील मल बाहेर पडण्यास मदत होते.
काही वेळा अपचन, अन्न असहिष्णुता, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा आतड्यांच्या संसर्गामुळेही पोटातून आवाज येऊ शकतो. पोटातून आवाज येण्यासोबत तीव्र पोटदुखी, उलट्या, ताप, सतत जुलाब, पोट खूप फुगणे किंवा शौचास अडथळा येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Leave a Reply