युद्ध म्हटले की डोळ्यांसमोर सीमेवर लढणारे सैनिक, उद्ध्वस्त होणारी शहरे आणि माणसांची जीवितहानी उभी राहते. पण या युद्धाची सर्वात मोठी आणि मुकी किंमत निसर्गाला, विशेषतः महासागरातील कोट्यवधी जलचरांना मोजावी लागते. जगाला हेच कटू सत्य दाखवण्यासाठी ५६ वर्षीय ब्रिटिश जलतरणपटू लुईस पुघ यांनी धाडसी मोहीम हाती घेतली आहे.
सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जगातील सर्वात धोकादायक सागरी युद्धक्षेत्र बनलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत त्यांनी तीन दिवस पोहून १५ किलोमीटरचे अंतर पार केले. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे पॅट्रन ऑफ द ओशन्स असलेले पुघ यापूर्वी उत्तर ध्रुव, अंटार्क्टिका, लाल समुद्र आणि इंग्लिश चॅनल यांसारख्या अतिशय कठीण आणि गोठवणाऱ्या पाण्यात पोहले आहेत.
पाण्यात उतरताच ३० मिनिटांत स्फोट
पुघ यांनी ओमानच्या किनाऱ्याजवळील मुसांदम द्वीपकल्पापासून आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि होर्मुझच्या भूशिराच्या काही भागाला प्रदक्षिणा घालत एकूण १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतर पूर्ण केले. सोमवारी त्यांनी पाण्यात उडी मारल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांतच त्यांच्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर एका तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला झाला.
त्या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की समुद्राचे पाणी हादरून गेले. वर आकाशात लढाऊ विमाने घिरट्या घालत होती. त्या क्षणी पुघ यांना वाटले की ताबडतोब पाण्यातून बाहेर पडून जीव वाचवला पाहिजे. पण ज्या उद्देशासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेतली होती, त्या विचाराने त्यांना पुन्हा बळ दिले आणि ते थांबले नाहीत.
जळणाऱ्या टँकरचे दृश्य
पुढील दिवसांत पोहत असताना त्यांनी एका गॅस टँकरवर झालेला हल्ला अगदी जवळून पाहिला. त्या जहाजाला भीषण आग लागली होती आणि समुद्रात पसरलेल्या इंधनामुळे आजूबाजूचे पाणीही आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले होते. पुघ यांनी या दृश्याचे वर्णन आगीचा एक प्रचंड गोळा असे केले.
जिथे क्षणाक्षणाला क्षेपणास्त्रांचे हल्ले होत आहेत आणि जहाजे पेटवली जात आहेत, अशा युद्धभूमीत पोहण्याचा हा अनुभव त्यांच्यासाठी सर्वात भयावह आणि जीवघेणा ठरला, असे त्यांनी सांगितले. सागरी जीवसृष्टी आणि पर्यावरणाला होत असलेल्या हानीकडे जगाचे लक्ष वेधणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
Leave a Reply