प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सोमवारी, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने २०१८ मधील फौजदारी मानहानीच्या एका प्रकरणात राठी यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी अनम रईस खान यांच्या न्यायालयाने तक्रारदार विकास पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
हा कायदेशीर वाद मे २०१८ मध्ये ध्रुव राठी यांनी युट्युबवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओपासून सुरू झाला. ‘भाजप आयटी सेल भाग-२’ नावाच्या या व्हिडिओमध्ये राठी यांनी असा आरोप केला होता की, भाजपच्या आयटी सेलने तक्रारदार विकास पांडे यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. विकास पांडे यांनी हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे. हे आरोप आपली प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने केल्याचा दावा त्यांनी केला आहे. विकास पांडे हे ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ या सोशल मीडिया पेजचे संस्थापक आहेत. त्यांनी राठी यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
न्यायालयाने कठोर भूमिका का घेतली?
न्यायालयाच्या नोंदींनुसार, याआधी दोनदा राठी यांच्याविरुद्ध समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र ध्रुव राठी प्रामुख्याने जर्मनीमध्ये राहत असल्याने त्यांना समन्स बजावण्यात आणि त्यांची न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थिती सुनिश्चित करण्यात अनेक वर्षांपासून अडचणी येत आहेत. दरम्यान, राठी हे नुकतेच ‘कॉकरोच जनता पार्टी’द्वारे आयोजित एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. त्यानंतर ते ऑक्टोबर महिन्यात पुन्हा जर्मनीला परतले.
याआधी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने तक्रारदारांच्या वकिलांनी दाखल केलेला एक अर्ज स्वीकारला होता. या अर्जात प्रकरणाची सुनावणी जलद गतीने घेण्याची आणि राठी यांच्या नावे ‘दस्ती’ समन्स जारी करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही राठी न्यायालयात हजर न राहिल्यामुळे सोमवारी न्यायालयाने कठोर भूमिका घेत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या आदेशामुळे, ध्रुव राठी जर भारतात परतले, तर त्यांना अटक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Leave a Reply