फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी काकती येथील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ घडली. या प्रकरणी रात्री उशिरा काकती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून, चोरट्यांची छबी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दागिने हिसकावून पलायन
बेळगाव येथे नातेवाईकांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आलेले एक कुटुंब कार्यक्रम आटोपल्यानंतर कारने गावी परतत होते. वाटेत काकती येथे फळे खरेदी करण्यासाठी त्यांनी कार थांबवली. कुटुंबातील इतर सदस्य कारमध्येच थांबले होते. महिला फळांच्या दुकानाकडे जात असताना पाठीमागून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांना जोरदार हिसडा मारला.
या घटनेत ३५ ग्रॅमचे गंठण, ६ ग्रॅमचे लहान गंठण आणि १० ग्रॅमची सोनसाखळी असे एकूण ५१ ग्रॅम वजनाचे व ५ लाख १० हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. हिसकावण्याच्या प्रयत्नात ९ ग्रॅम सोन्याचा एक तुकडा खाली पडल्याने तो चोरट्यांच्या हाती लागला नाही. एका चोरट्याने दागिने हिसकावले, तर दुसरा मोटारसायकल सुरू ठेवून त्याची वाट पाहत होता. दागिने हिसकावताच दोघांनी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पलायन केले.
महिला या निपाणी येथील विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या नात्यातील मुलांना भेटण्यासाठी फळे घेऊन जाणार होत्या. त्याचवेळी ही घटना घडली.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे दोघा चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
Leave a Reply