स्मार्टफोनमध्ये दररोज शेकडो फोटो, व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट जमा होतात. गुगलकडून प्रत्येक वैयक्तिक खात्यासाठी केवळ १५ जीबी मोफत क्लाउड स्टोरेज दिले जाते, जे गुगल फोटोज, जीमेल आणि गुगल ड्राइव्ह या तिन्हीसाठी सामायिक असते. हे स्टोरेज पूर्ण भरले, तर नवीन ईमेल येणे किंवा फोटोचा बॅकअप होणे थांबते. अशा वेळी एकही रुपया खर्च न करता स्टोरेज कसे मोकळे करावे, याबाबत गुगलने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
अनावश्यक फोटो आणि स्क्रीनशॉट हटवा
तात्पुरत्या कामासाठी घेतलेले स्क्रीनशॉट किंवा व्हॉट्सॲपवर आलेले फोटो आपण हटवायला विसरतो. हे फोटो क्लाउडवर आपोआप जतन होऊन मोठी जागा व्यापतात. मोबाईल ॲपऐवजी संगणकावरून गुगल फोटोजच्या संकेतस्थळावर लॉगिन केल्यास असे अनावश्यक फोटो आणि स्क्रीनशॉट मोठ्या संख्येने निवडणे व सुरक्षितपणे हटवणे अधिक सोपे जाते. भविष्यात स्क्रीनशॉटचा बॅकअप होऊ नये, म्हणून ‘बॅक अप डिव्हाइस फोल्डर्स’मधील स्क्रीनशॉट फोल्डर बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मोठ्या फाइल्स शोधण्यासाठी ‘मॅनेज स्टोरेज’ वापरा
फोटोंपेक्षा व्हिडिओ फाइल्स स्टोरेजची सर्वाधिक जागा व्यापतात. काही मिनिटांचा उच्च दर्जाचा किंवा ४के व्हिडिओ कित्येक जीबी जागा घेतो. गुगल फोटोजमध्येच ‘मॅनेज स्टोरेज’ (क्लीन अप स्पेस) हे विशेष साधन उपलब्ध आहे. गुगल फोटोज उघडून प्रोफाइल चिन्हावर क्लिक केल्यास स्टोरेज व्यवस्थापनाचा पर्याय दिसतो. त्यात ‘लार्ज फोटोज अँड व्हिडिओज’, ‘ब्लरी फोटोज’ आणि ‘स्क्रीनशॉट्स’ अशा स्वतंत्र श्रेणी दिल्या आहेत. या सुविधेमुळे सर्वाधिक जागा व्यापणाऱ्या फाइल्स सहज शोधून त्या हटवता येतात.
हटवण्यापूर्वी ऑफलाइन बॅकअप घ्या
क्लाउडवरून महत्त्वाच्या आठवणी कायमच्या काढून टाकण्यापूर्वी त्यांचा ऑफलाइन बॅकअप घेणे अत्यंत गरजेचे आहे. महत्त्वाचे फोटो आणि व्हिडिओ यूएसबी फ्लॅश ड्राइव्ह, यूएसबी-सी पेनड्राइव्ह किंवा पोर्टेबल एसएसडीमध्ये जतन करून ठेवता येतात. खात्यातील सर्व डेटा एकाच वेळी डाउनलोड करायचा असेल, तर गुगलची गुगल टेकआउट ही मोफत सेवा उपयुक्त ठरते. या सेवेद्वारे सर्व फोटो एका झिप फाइलमध्ये संगणक किंवा हार्ड ड्राइव्हवर सुरक्षित काढून घेता येतात.
कोणताही फोटो किंवा व्हिडिओ हटवल्यानंतर तो थेट कायमचा नष्ट होत नाही, तर ६० दिवसांसाठी ‘ट्रॅश’ फोल्डरमध्ये राहतो. ‘ट्रॅश’ फोल्डर रिकामे केल्याशिवाय स्टोरेजची जागा मोकळी होत नाही. तसेच, गुगल फोटोजच्या बॅकअप दर्जाच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘ओरिजिनल क्वालिटी’ऐवजी ‘स्टोरेज सेवर’ हा पर्याय निवडल्यास फोटोच्या गुणवत्तेत फारसा फरक न पडता फाइल्सचा आकार कमी होतो आणि स्टोरेजची मोठी बचत होते.
Leave a Reply