राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ सहन करावी लागत आहे. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या परिस्थितीत लाडकी बहीण योजनेचा बोजा अर्थव्यवस्थेवर पडत असल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी या योजनेबद्दल मोठं विधान केलं आहे.
योजनेचा बोजा नाही, शेतकरीच प्राथमिकता
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काही बोजा पडत असेल, असं मला वाटत नाही, असं डावखरे म्हणाले. त्याचं नियोजन करण्यासाठी राज्य शासन निश्चितपणे सक्षम आहे, असंही ते म्हणाले. अर्थखातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे राज्याच्या प्राथमिकता काय आहेत, याची त्यांना निश्चितपणे जाणीव आहे, असं डावखरे यांनी सांगितलं.
आज सगळ्यात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे, असं डावखरे म्हणाले. राज्यावर दुष्काळाचं संकट असताना शेतकरी हीच शासनाची प्राथमिकता निश्चितपणे राहणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सोन्याच्या दरांवर आणि आरोपांवर भूमिका
सोन्याच्या कोसळणाऱ्या दरावर बोलताना डावखरे म्हणाले की, पंतप्रधानांनी यापूर्वीही परदेश दौरे टाळावेत आणि सोने खरेदीबाबतही थोडेसे निर्बंध पाळावेत, अशा सूचना देशाचे प्रमुख म्हणून दिल्या होत्या. त्या सूचना जनहितार्थ होत्या आणि आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आता सोन्याच्या भावात झालेली घसरण ही जागतिक स्तरावरची आहे. त्यामागची आर्थिक कारणं तपासली जात आहेत, असं त्यांनी सांगितलं.
आमदार रोहित पवार यांच्या ‘मफलरमॅन’ आरोपावरही डावखरे यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार प्रसिद्धीसाठी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून वेगवेगळे स्टंट करत आहेत, असं डावखरे म्हणाले. स्वतःला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे स्टंट करणं ही त्यांच्या दृष्टिकोनातून शोकांतिका आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आपण एक आमदार आहोत आणि जबाबदार आमदार म्हणून लोकांना काय माहिती देत आहोत, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे, असं डावखरे म्हणाले. रोहित पवार स्वतः व्हीएसआर यांच्या विमानामधून फिरतात, त्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले गेले आहेत, त्यामुळे त्यांचे काही संबंध आहेत का, याबाबत त्यांनी स्पष्टपणे माहिती दिली पाहिजे, असंही डावखरे म्हणाले.
Leave a Reply