वजन कमी करण्यासाठी अनेकजण आहारावर नियंत्रण ठेवतात. जेवणाचे प्रमाण कमी करतात, मधल्या वेळचे स्नॅक्स टाळतात आणि गोड पदार्थांपासून दूर राहतात. तरीही इतके प्रयत्न करूनही वजनाचा काटा काही हलत नाही. कमी खाऊनही वजन कमी होत नसेल, तर त्यामागे काही छोट्या पण महत्त्वाच्या चुका कारणीभूत असू शकतात. वजन कमी करणे म्हणजे केवळ कमी खाणे नव्हे. तुम्ही काय खाता, किती प्रमाणात खाता, दिवसभर किती सक्रिय राहता आणि तुमच्या झोपेच्या सवयी कशा आहेत, या सर्व गोष्टी वजनावर परिणाम करतात.
वजन न घटण्यामागच्या सात चुका
लपलेल्या कॅलरींकडे दुर्लक्ष: जेवणाचे प्रमाण कमी केले असले, तरी दिवसभरात शरीरात जाणाऱ्या एकूण कॅलरींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. स्वयंपाकात वापरले जाणारे तेल, सॉस, सॅलड ड्रेसिंग, सुकामेवा आणि मधल्या वेळेत खाल्ले जाणारे छोटे पदार्थ यांमधूनही अतिरिक्त कॅलरी मिळतात.
अतिशय कमी खाणे: लवकर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अनेकजण नाश्ता टाळतात, रात्रीचे जेवण करत नाहीत किंवा अतिशय कमी आहार घेतात. सुरुवातीला ही पद्धत फायदेशीर वाटू शकते; मात्र दीर्घकाळासाठी ती योग्य ठरत नाही. खूप कमी खाल्ल्यामुळे वारंवार भूक लागू शकते आणि गोड किंवा तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. दिवसभर पुरेसे न खाल्ल्याने रात्री जास्त खाण्याची शक्यता असते. तसेच शरीरातील स्नायूंचे प्रमाण टिकवून ठेवणेही कठीण होऊ शकते.
आहारात प्रोटीनचे प्रमाण कमी: वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत प्रोटीनची भूमिका महत्त्वाची असते. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते. तसेच वजन कमी करताना स्नायूंचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठीही ते आवश्यक आहे. तुमच्या आहारात प्रोटीन कमी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असेल, तर जेवल्यानंतरही लवकर भूक लागू शकते.
पेयांमधून मिळणाऱ्या कॅलरी: वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना अनेकजण खाण्यावर लक्ष देतात; मात्र काय पितात याकडे दुर्लक्ष करतात. चहा-कॉफीमध्ये घातलेली साखर, फळांचे ज्यूस, पॅकेज्ड ड्रिंक्स आणि गोड पेयांमधून शरीरात अतिरिक्त कॅलरी जातात. विशेष म्हणजे, अशा पेयांमुळे पोट भरल्याची भावना फार काळ टिकत नाही. त्यामुळे नकळत कॅलरींचे सेवन वाढते. यासाठी साखर नसलेली पेये आणि साध्या पाण्याला प्राधान्य द्या.
शारीरिक हालचालींचा अभाव: वजन कमी करण्यासाठी केवळ आहारावर नियंत्रण ठेवणे पुरेसे नसते. दिवसभरातील शारीरिक हालचालीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. अनेकजण दररोज ३० मिनिटे व्यायाम करतात; मात्र उर्वरित वेळ बराच वेळ बसून घालवतात. सतत बसून काम करणे, कमी चालणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे दिवसभरात खर्च होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे रोज चालण्याची सवय लावा.
अपुरी झोप: वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत झोप आणि मानसिक आरोग्यालाही महत्त्व आहे. अपुरी झोप आणि सततचा ताण यांचा भूक आणि खाण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप न झाल्यास गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आणि झटपट ऊर्जा देणारे पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. त्यामुळे वजन कमी करण्याचे प्रयत्न अडचणीत येतात. दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा.
वजन झटपट कमी होण्याची अपेक्षा: वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना अनेकजण दररोज वजनकाट्यावर उभे राहतात. मात्र वजनात रोज होणारा बदल म्हणजे शरीरातील चरबी कमी किंवा जास्त झाली असे नाही. हार्मोन्समधील बदल, महिलांमधील मासिक पाळीचे चक्र, शरीरात पाणी साठणे, पचनक्रिया आणि स्नायूंचे प्रमाण वाढणे अशा विविध कारणांमुळे वजनाच्या आकड्यात चढ-उतार होऊ शकतात.
वजन कमी करण्यासाठी काय करावे?
वजन कमी करणे म्हणजे उपाशी राहणे किंवा आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करणे नव्हे. त्यासाठी संतुलित आहार, पुरेसे प्रोटीन, नियमित व्यायाम आणि चांगली झोप या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. छोट्या-छोट्या सवयींमध्ये सकारात्मक बदल केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी घाई करण्यापेक्षा दीर्घकाळ टिकतील अशा आरोग्यदायी सवयी अंगीकारा. वजन कमी होत नसल्याची समस्या कायम असल्यास आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Leave a Reply