गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तीन लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. भुज-खवडा राष्ट्रीय महामार्गावर खवडा परिसराजवळ कार आणि ट्रेलरची जोरदार धडक होऊन ही दुर्दैवी घटना घडली.
अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अपघातातील मृत हे लष्करातील एका कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व ७ जण एकाच कुटुंबातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अपघात कसा झाला?
अधिकृत माहितीनुसार, खवडाजवळ कारची ट्रेलरला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. कारचे दोन तुकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेचा आवाज ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी धावले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. वाहतूककोंडीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत तीन लहान मुलांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सात जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Leave a Reply