नवी दिल्लीतून समोर आलेल्या एका महत्त्वाच्या अहवालाने भारताच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. अमेरिकेच्या काँग्रेसच्या २०२६ च्या अहवालात असे म्हटले आहे की, भारताचा सामना करण्यासाठी चीन पाकिस्तानला सातत्याने लष्करी मदत पुरवत आहे. दोन्ही देशांमधील वाढती लष्करी जवळीक भारतासाठी एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्धाची शक्यता निर्माण करणारी ठरू शकते, अशी चिंता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
ऑपरेशन सिंदूरमधून उघड झालेले वास्तव
मे २०२५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी चीनने थेट युद्धात न उतरताही संकटाच्या काळात पाकिस्तानला पडद्यामागून मदत कशी करता येते, हे स्पष्ट झाले. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानसोबत कोणताही संघर्ष झाल्यास चीन मागून पाकिस्तानला बळ देऊ शकतो, ही भारताची चिंता अधिक वाढली आहे.
भारताच्या वाढीची चीनला भीती
अहवालात भारताच्या वाढत्या ताकदीवरही सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. भारत हा जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्याच्याकडे मोठी लोकसंख्या, मजबूत अर्थव्यवस्था, लष्करी सामर्थ्य आणि भौगोलिक क्षमता आहे. ही ताकद चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
चीन भारताच्या विकासाला स्वतःसाठी धोका मानतो. त्यामुळेच भारताची प्रगती रोखण्यासाठी चीनकडून लष्करी, आर्थिक, सागरी आणि इतर अनेक मार्गांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अहवालात नमूद आहे.
गलवान संघर्षानंतर कायमचा अविश्वास
भारत आणि चीनमधील तणावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही देशांमधील सीमावाद आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेली हिंसक झडप दोन्ही देशांच्या संबंधांतील सर्वात मोठा टप्पा ठरली. या घटनेनंतर भारताने स्पष्ट भूमिका घेतली की, सीमावाद बाजूला ठेवून चीनसोबत इतर क्षेत्रांतील संबंध सामान्य करता येणार नाहीत.
२०२० च्या संघर्षानंतर तब्बल चार वर्षांनी, म्हणजेच २०२४ च्या अखेरीस भारत आणि चीनने संबंध पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंनी अनेक बैठकाही झाल्या. मात्र, आजही दोन्ही देशांमध्ये अविश्वासाचे वातावरण कायम असून, सीमेवर पूर्णपणे शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय सर्वसमावेशक संबंध सुधारणार नाहीत, या भूमिकेवर भारत ठाम आहे.
Leave a Reply