रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अमेरिकेत ९० दिवस ब्लॅकआऊटची अफवा; खरेदीसाठी गर्दी

अमेरिकेत ९० दिवस वीज बंद राहणार असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी किराणा दुकानांत गर्दी केली आहे. मात्र कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

अमेरिकेत ९० दिवस ब्लॅकआऊटची अफवा; खरेदीसाठी गर्दी

अमेरिकेतील किराणा मालाच्या दुकानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकाएकी गर्दी वाढू लागली आहे. लाखो अमेरिकन नागरिक बाटलीबंद पाणी, दीर्घकाळ टिकणारे अन्न आणि अत्यावश्यक गरजेच्या वस्तू खरेदी करत आहेत. देशात तीन महिने म्हणजेच ९० दिवस वीज आणि अन्य गरजेच्या सेवा ठप्प होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर फिरत असल्याने ही गर्दी वाढल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे दावे अफवा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

## सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

अमेरिकेत ९० दिवसांचा ब्लॅकआऊट होणार असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. डूम्स डे प्लानच्या अंतर्गत लोकांना घरात गरजेच्या वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन या पोस्टमधून करण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्टपासून बँकांपर्यंत निर्माण झालेल्या तांत्रिक समस्यांमुळे ब्लॅकआऊटच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. कोणत्याही संकटासाठी सज्ज राहण्याचे आवाहन सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केले जात आहे.

## ट्रम्प आणि वान्स यांची प्रतिक्रिया

दुकानांमध्ये गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी होत असलेली गर्दी पाहून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. डूम्स डेसारख्या स्थितीसाठी तयारी करण्याची कोणतीही गरज नसल्याचे दोघांनी म्हटले आहे. सगळे काही व्यवस्थित सुरू असल्याचे ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितले. जर काही समस्या असेल तर मी तुम्हाला सांगेन, असेही ते म्हणाले. बंकर उभारण्याची तयारी घ्यायची का किंवा अन्न-पाण्याचा साठा करून ठेवायचा का, असे प्रश्न अनेक मित्रांनी विचारल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर त्यांचे उत्तर अजिबात नाही, असे होते.

सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्निया, ओहियो आणि ओक्लोहोमामधील अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली आहे. आपत्कालीन स्थितीत कामी येणाऱ्या वस्तूंची विक्री अचानक वाढली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच वॉलमार्टचे ग्राहक सरासरीपेक्षा अधिक प्रोपेन, बाटलीबंद पाणी आणि कॅम्पिंगचे साहित्य खरेदी करून त्याचा साठा करून ठेवत आहेत. अमेरिकेत ९० दिवसांपर्यंत वीज पुरवठा बंद राहण्याची किंवा पॉवर ग्रीड बंद ठेवण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. काही व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रम्प ९० दिवस वीज बंद केली जाईल, असे म्हणत असल्याचे दिसते. मात्र ट्रम्प यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance