क्रिकेट चाहत्यांना रविवारी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेच्या निमित्ताने भारत अ आणि पाकिस्तान अ हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. रविवारी २२ नोव्हेंबरला दोहा येथे हा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत विजयी सलामी दिली असल्याने या सामन्यानंतर कोणत्या तरी एका संघालाच सलग दुसरा विजय मिळवता येईल.
## दोन्ही संघांची विजयी सलामी
स्पर्धेतील आठव्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. बी ग्रुपमधील दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील दुसरा आणि एकमेकांविरुद्धचा पहिला सामना असणार आहे. तिलक वर्मा याच्याकडे भारत अ संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे, तर अब्दुल समद पाकिस्तान अ टीमचे नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांसाठी एकमेकांविरुद्धचा सामना हा प्रतिष्ठेचा आहे, त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.
भारताने या मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली. भारताने शुक्रवारी २० नोव्हेंबरला नेपाळचा तब्बल ३०६ धावांनी धुव्वा उडवला. कुमार कुशाग्रा आणि तिलक वर्मा या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने नेपाळसमोर ३३३ धावांचे आव्हान ठेवले. मात्र भारतीय गोलंदाजांनी नेपाळला २६ धावांवर गुंडाळले. पाकिस्तान अ टीमने शुक्रवारी यूएईच्या संघावर ६१ धावांनी विजय मिळवला. यूएईने पाकिस्तानला ४६.४ षटकांत २४५ धावांवर ऑलआऊट केले, मात्र यूएईला २०० धावांपर्यंतही पोहोचता आले नाही. पाकिस्तानने यूएईला ४०.५ षटकांत ऑलआऊट केले.
## पाकिस्तानसमोर भारताच्या फलंदाजीचे आव्हान
इंडिया अ टीममध्ये एकसेएक फलंदाजांचा समावेश आहे. अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह अशी प्रमुख फलंदाजांची नावे आहेत. त्यातही तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्रा या दोघांनी नेपाळ विरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यामुळे पाकिस्तानसमोर भारताच्या विस्फोटक फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे.
## टीम इंडिया पराभवाचा हिशोब करणार?
टीम इंडियाकडे या सामन्यात विजय मिळवून जुना हिशोब चुकता करण्याची संधी आहे. पाकिस्तानने टीम इंडियावर गेल्या वर्षी, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या सामन्यात विजय मिळवला होता. भारताचा त्या सामन्यात ८ विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे आता टीम इंडिया बरोबर एक वर्षानंतर शेजाऱ्यांचा हिशोब चुकता करण्यात यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना आहे.
दरम्यान, सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे, तर ३ वाजता टॉस होणार आहे. सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
Leave a Reply