बारामती शहरात शनिवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एमआयडीसी परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या गाडीवर सायंकाळी सहा वाजता अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार होण्याआधी त्याच दिवशी दुपारी कोळेकर यांना धमकीचा फोन आला होता. हा फोन त्यांच्या इन्स्टाग्रामवर आल्याचे सांगण्यात येते. या फोनद्वारे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. धमकीनंतर काही तासांतच अज्ञात हल्लेखोर कोळेकर यांच्या घराजवळ आले, घराचे गेट उघडून त्यांनी थेट गोळीबार केला. हल्लेखोर दुचाकीवर आल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत असल्याचे सांगण्यात येते.
धमकीनंतर काही तासांत गोळीबार
दुपारी धमकीचा फोन आल्यानंतर सायंकाळी सहा वाजता गोळीबार झाल्याने या घटनेमागे खंडणीचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हल्लेखोर कोण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेनंतर परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात येते.
खासदार सुप्रिया सुळे यांची तीव्र प्रतिक्रिया
या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली असून घटनेचा व्हिडीओही शेअर केला आहे. बारामती आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देऊन त्यांच्या घराच्या आवारात घुसून गोळीबार करण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बारामती पोलीस नेमके काय करत आहेत आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावणे आणि घरासमोर येऊन गोळीबार करणे हे प्रकार बारामतीसारख्या शहरात घडणे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी, सखोल तपास करून गोळीबार करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुणे ग्रामीण पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
Leave a Reply