पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि जागतिक व्यासपीठावरील भारताच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राचा आधार घेत राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. या टीकेला चव्हाण यांनी पुराव्यानिशी उत्तर दिले आहे.
चव्हाणांनी शेअर केले दोन फोटो
राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी चव्हाण यांनी समाजमाध्यमावर दोन महत्त्वाची छायाचित्रे शेअर केली. एका छायाचित्रात 2011 मध्ये फ्रान्स येथे झालेल्या जी20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक नेत्यांच्या मागील रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. याउलट, 2024 मध्ये रिओ दि जानेरो येथे पार पडलेल्या जी20 परिषदेतील छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व जागतिक नेत्यांच्या मध्यभागी, म्हणजेच केंद्रस्थानी उभे असल्याचे दिसत आहे.
या दोन्ही छायाचित्रांच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा आणि ताकद अधोरेखित केल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
रवींद्र चव्हाणांचा थेट इशारा
राहुल गांधींच्या भूमिकेवर कठोर शब्दांत प्रहार करताना चव्हाण म्हणाले की, भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासे होते. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झाली आहे. या सत्तेच्या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा. कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
राजकीय सत्तासंघर्षापलीकडे देशाची जागतिक प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवर थेट निशाणा साधला आहे.
Leave a Reply