जन्मतःच गंभीर दुखापत झालेल्या आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या अवघ्या सात आठवड्यांच्या ‘राजा’ नावाच्या हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी एक मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. आसाममधील या चिमुकल्या पिल्लाला विशेष आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी गुवाहाटी येथून गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ प्राणी रुग्णालयात विमानाने आणण्यात आले आहे.
जन्मानंतरची दुखापत आणि सात आठवड्यांचा संघर्ष
‘राजा’चा जन्म 2 ऑक्टोबर रोजी आसाममधील गोगामुख येथे झाला होता. जन्मानंतर काही वेळातच त्याच्या 11 वर्षांच्या आईची चुकून लाथ लागल्याने त्याच्या उजव्या मागच्या पायाचे मांडीचे हाड पूर्णपणे मोडले. या दुखापतीमुळे पिल्लाला उभे राहणे किंवा पायांवर वजन देणे अशक्य झाले होते. तसेच, नवजात हत्तीला रोगप्रतिकारक शक्ती देणारे आईचे पहिले दूधही त्याला मिळू शकले नाही.
मालक आणि काळजीवाहकांच्या विनंतीवरून वनताराची जलद प्रतिसाद टीम 8 ऑक्टोबर रोजी ‘राजा’पर्यंत पोहोचली. क्ष-किरण तपासणीत तुटलेले हाड जागेवरून सरकल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर टीमने प्लास्टर कास्ट, आधार देणाऱ्या पट्ट्या आणि झोळीच्या मदतीने त्याला उभे राहण्यास मदत केली. त्याला विशेष पद्धतीने तयार केलेले दूधही देण्यात आले. 10 ऑक्टोबर रोजी त्याला पोहुमारा येथील मालकाच्या घरी हलवून जवळच एक जलचिकित्सा तलाव तयार करण्यात आला, जेणेकरून पायावर वजन न देता त्याला हालचाल करता येईल.
मात्र, अलीकडेच राजाला जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि चाचण्यांमध्ये त्याला ‘क्लेबसिएला न्यूमोनिया’ या जिवाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. याशिवाय रक्तातील साखर वारंवार कमी होणे, यकृताचे वाढलेले निर्देशांक, सतत पडून राहिल्याने डोक्याला झालेले व्रण आणि हर्निया यामुळे त्याची प्रकृती अधिकच गुंतागुंतीची बनली होती.
चार तासांचा हवाई प्रवास आणि पुढील उपचार
‘राजा’ची अत्यंत नाजूक प्रकृती लक्षात घेता, 2,500 किलोमीटरहून अधिकचा रस्ते प्रवास त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकला असता. त्यामुळे ‘वनतारा’चे संस्थापक अनंत अंबानी यांच्या विशेष पुढाकाराने आणि सहकार्याने हे हवाई बचावकार्य पार पडले. अनंत अंबानींच्या मदतीने भारतात पार पडलेली अशा प्रकारची ही तिसरी मोठी बचाव मोहीम आहे.
‘राजा’ला गुवाहाटीहून जामनगरला आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. जखमी पायाला आधार मिळावा आणि जखमांचे संरक्षण व्हावे यासाठी मऊ गादी असलेल्या विशेष पेटीतून त्याचा प्रवास झाला. चार तासांच्या या संपूर्ण विमान प्रवासादरम्यान राजाचे प्राणवायू, पाण्याचे प्रमाण आणि रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर, सहाय्यक आणि काळजीवाहकांची टीम त्याच्यासोबत होती.
जामनगरमधील ‘वनतारा’ हत्ती रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता ‘राजा’वर प्रगत निदान, तज्ज्ञ हाडांचे उपचार, वेदना व्यवस्थापन, हालचाल उपचार आणि दीर्घकालीन पुनर्वसन उपचार सुरू केले जाणार आहेत. वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनान करानी यांनी सांगितले की, राजा या जगात तुटलेल्या पायाने आला, पण त्याची जिद्द कधीच तुटली नाही. गेल्या सात आठवड्यांपासून तो आपल्या चिमुकल्या शरीरापेक्षाही मोठ्या धैर्याने झुंज देत आहे. अनंत अंबानी यांच्या करुणा आणि पाठिंब्यामुळे रस्त्याने अनेक दिवस लागणारा प्रवास विमानाने काही तासांत पूर्ण झाला असून, वनतारा येथे त्याला उभे राहण्याची, चालण्याची आणि एके दिवशी धावण्याची प्रत्येक संधी दिली जाईल.
Leave a Reply