रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मराठा आरक्षण: विखे पाटलांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

मराठा आरक्षण उपसमितीला निर्णयाचे अधिकार द्या, अन्यथा ती बरखास्त करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. विखे पाटलांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली.

मराठा आरक्षण: विखे पाटलांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

मराठा आरक्षणाच्या लढ्यात नवा ट्विस्ट आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीला ओबीसी आरक्षण उपसमितीच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे अधिकार द्या, अन्यथा ही समिती बरखास्त करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. शिर्डी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांची बैठक पार पडली आणि या बैठकीत ही मागणी करण्यात आली.

शिर्डीतील बैठकीत एकमुखी मागणी

शिर्डीतील बैठकीत मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. ते केवळ मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलन यांच्यातील पोस्टमन म्हणून काम करणार असतील, तर त्यांनी तातडीने समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. ओबीसी आरक्षण समितीच्या धर्तीवर मराठा आरक्षण उपसमितीला निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत, अन्यथा ही समितीच बरखास्त करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरुवातीला मराठवाड्याला समोर ठेवून सुरू झाले होते. मात्र मनोज जरांगे यांनी हे आंदोलन राज्यव्यापी केल्याने मराठवाड्यातील मराठ्यांच्या मागण्या मागे पडल्या. मराठवाड्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचा शब्द देऊनही राज्य सरकारने अद्याप बैठक घेतली नाही. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याअगोदर ही बैठक झाली नाही, तर अधिवेशनादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा किशोर चव्हाण यांनी दिला आहे.

जरांगेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि मोर्चाची भूमिका

या बैठकीत मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ज्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत, अशा मागण्या मनोज जरांगे यांनी मांडल्या. त्यातून त्यांची अपरिपक्वता दिसून येते. जरांगे समाजातील अभ्यासकांना विचारात घेत नाहीत. त्यांना एकट्यालाच नेता व्हायचे आहे. समाजाची हानी होत असल्याने मराठा क्रांती मोर्चा पुन्हा मैदानात आला आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समन्वयक संजीव भोर यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या पुढील भवितव्यासाठी अनेक बाबी आवश्यक आहेत. गेल्या एक-दीड वर्षांपासून शासन मराठा समाजाच्या विरोधात वातावरण तयार करत असल्याची शंका आहे. त्यामुळे मराठा समाजाचे भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा सक्रिय झाला आहे, अशी प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance