तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वीच एफडीएने पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली तसेच हॉटेल रुपालीवर कारवाई करत थेट परवाना रद्द केला होता. या कारवाईने पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. अशातच आता एफडीएने नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई केली आहे.
नाशिकमध्ये पाच हॉटेल्सवर कारवाई
नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने पाच नामांकित हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. कॉलेज रोडवरील दुर्गा कॅफेचे नोंदी प्रमाणपत्र एफडीएने निलंबित केले आहे. तसेच तुषार, शामसुंदर आणि विहार या तीन नामांकित मिसळ हॉटेल्सवरही छापे टाकण्यात आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या गंभीर तक्रारींनंतर एफडीएने ही कारवाई केली आहे.
एफडीएने नाशिकमधील जुना गंगापूर नाका, गंगापूर रोडवर असलेल्या प्रसिद्ध हॉटेल विहारवर कारवाई केली आहे. हॉटेल विहारच्या तपासणीमध्ये अधिकाऱ्यांना अस्वच्छता आढळली. अन्न सुरक्षा व मानक नियमांचे उल्लंघन तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी किटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव आढळला, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्याचसोबत सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या हॉटेल शामसुंदरवरही कारवाई केली आहे. हॉटेल शामसुंदरमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या.
दुर्गा कॅफे, तुषार मिसळ आणि महाराजा काठियावाडीवरही बडगा
एफडीएने कॉलेज रोडवर असलेल्या दुर्गा कॅफेलाही दणका दिला आहे. अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन, तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले. मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा उल्लेख नसल्याचेही निदर्शनास आले. शहरातील असवारी चौकासमोर असलेल्या तुषार मिसळलाही एफडीएने चांगलाच दणका दिला आहे. तुषार मिसळमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले.
त्याचबरोबर आडगाव फाटा येथे असलेल्या हॉटेल महाराजा काठियावाडीवरही एफडीएने कारवाई केली आहे. हॉटेल महाराजा काठियावाडीच्या आस्थापनेमध्ये अस्वच्छता आढळली, स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आढळली, तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी धूळ व किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले. त्यानंतर एफडीएने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Leave a Reply