गावाकडची दृश्ये मन मोहून घेणारी असतात. पण कधी काही क्षण असे घडतात की थांबून बघतच बसावेसे वाटते. डोक्यावर गवताचा मोठा भारा घेऊन जाणारी महिला आणि त्याच गवताच्या भाऱ्यावर आरामात राजेशाही थाटात डौलदारपणे बसलेला मोठा मोर — असे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
भाऱ्यावर मोराची सवारी
व्हायरल व्हिडिओमध्ये एक ग्रामीण महिला डोक्यावर गवताचा भारा घेऊन जाताना दिसत आहे. डोक्यावरील गवताचा भारा सांभाळत तिचे दोन्ही हात वर आहेत. भारा सांभाळत ती महिला चालतही आहे आणि तिच्या त्या डोक्यावरच्या भाऱ्यावर विराजमान आहे तो आपला राष्ट्रीय पक्षी मोर. हा तुरेवाला मोर गवताच्या भाऱ्यावर अगदी निवांत बसलेला दिसतो आहे. विशेष म्हणजे महिला चालत असताना तो तिथेच बसून राहतो. व्हिडिओमध्ये मोर गवतावर आपली जागा बदलताना दिसतो आणि पुढे झुकतानाही दिसतो. त्यामुळे हे दृश्य लक्ष वेधून घेणारे आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो मोर पाळलेला आहे की जंगली आहे हे देखील स्पष्ट झालेले नाही.
सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा
हा व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला. त्याला एका वापरकर्त्याने सुंदर दृश्य यापूर्वी कधीच पाहिले नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्याने गावाकडच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. सहसा मोर शेतात, मोकळ्या मैदानात किंवा झाडांजवळ फिरताना दिसतो. पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचणारा मोर तर अनेकांना आकर्षित करतो. पण इथे मात्र मोराने थेट महिलेच्या डोक्यावरील गवताच्या भाऱ्यावर मुक्काम ठोकल्याने हा व्हिडिओ नेटकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.
Leave a Reply