जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आज सत्यशोधक समाजाचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. अधिवेशनापूर्वी भुजबळ आणि कोल्हे यांच्यामध्ये खलबते झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्याबाबत आता दोन्ही नेत्यांनीच महत्त्वाचा खुलासा केला आहे.
भुजबळ काय म्हणाले
अमोल कोल्हे या कार्यक्रमासाठी आले होते आणि त्यांच्याशी आपले बोलणे झाले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. मात्र आजच्या कार्यक्रमाबाबतच चर्चा झाली, तसेच कोल्हे यांच्या मालिकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. सध्या तरी विलीनीकरण होईल असे वाटत नाही, असे महत्त्वाचे विधानही त्यांनी यावेळी केले.
कोल्हे यांनीही केला खुलासा
दुसरीकडे अमोल कोल्हे यांनीही या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि विलीनीकरणावर महत्त्वाचे विधान केले. अजित पवार होते तेव्हा चर्चा झाली नाही असे काही लोक म्हणत होते, मात्र आता ते अचानक चर्चा झाल्याचे सांगत आहेत. आता त्या लोकांना अचानक हे का बोलायला लागले, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत आमच्याकडे तशा कोणत्याही चर्चा सुरू नाहीत, असे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा माध्यमांमध्ये आहेत. याबाबतही खासदार अमोल कोल्हे यांनी खुलासा केला. काँग्रेसमध्ये जाणार असे रोहित पवारांनी माध्यमांना सांगितले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चर्चा काहीही घडवता येतात, असे ते म्हणाले. स्वतः रोहित पवार हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत धडाडीने विरोधकांची भूमिका मांडत आहेत. त्यावरून लगेच काही अर्थ काढणे चुकीचे आहे, असे कोल्हे म्हणाले. रोहित पवारांकडून महाराष्ट्राला आशा आहेत आणि ते युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. त्यामुळे अशी चर्चा आहे म्हणत त्यांच्यावर टॅग लावू नये, अशी विनंतीही खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
Leave a Reply