हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या ‘पुणेरी मेट्रो’च्या (माण-हिंजवडी ते शिवाजीनगर) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरील बाणेर गाव (पीएमआर-१५) आणि बाणेर-पाषाण लिंक रोड (पीएमआर-१६) ही दोन स्थानके येत्या डिसेंबर महिन्यात प्रवाशांसाठी खुली होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ही स्थानके सुरू होणं मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) तपासणीवर आणि त्यानंतरच्या तांत्रिक पूर्ततेवर अवलंबून असणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही स्थानकांचं बांधकाम पूर्ण झालं असून सध्या सीएमआरएस तपासणीपूर्वीचं अंतर्गत मूल्यमापन सुरू आहे. सीएमआरएसचं पथक याच आठवड्यात या मार्गाची पाहणी करणार आहे. मात्र, पाहणी झाल्यानंतर लगेचच सेवा सुरू होणार नाही.
सुरक्षा तपासणीनंतरच हिरवा कंदील
तपासणीदरम्यान पथकाने काही त्रुटी नोंदवल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित सवलतकारांना आणखी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागू शकतो. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेलं सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच प्रवाशांना या स्थानकांवरून प्रवास करता येईल. त्यामुळे डिसेंबरमधील नेमकी तारीख ही तपासणीच्या निकालावर अवलंबून राहणार आहे.
सध्या या २३.३ किलोमीटरच्या मार्गिकेवरील १७ स्थानके कार्यरत आहेत. बाणेरमधील ही दोन स्थानके सुरू झाल्यास कार्यरत स्थानकांची संख्या १९ वर पोहोचेल. या मार्गावरील उर्वरित चार स्थानके (पीएमआर-१३, पीएमआर-१४, पीएमआर-२० आणि पीएमआर-२२) टप्प्याटप्प्याने जानेवारी २०२७ पर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. ही सर्व २३ स्थानके सुरू झाल्यानंतरच प्रवाशांना पूर्ण क्षमतेने या मार्गाचा लाभ घेता येईल.
स्थानकांजवळच्या पार्किंगची समस्या
मेट्रोचे टप्पे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली असून, त्यासोबतच स्थानकांजवळ वाहनतळांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या वाहनतळांची पुरेशी सोय नसल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला किंवा उन्नत मेट्रो मार्गाखालीच वाहने उभी करत आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
पीएमआरडीएने माण-सिव्हिल कोर्ट या मार्गासह मेट्रो मार्गिकांलगत आठ ठिकाणी वाहनतळांसाठी जागा मागितली आहे. यातील बहुतांश जागा बाणेर आणि बालेवाडी परिसरातील आहेत. पुणे महानगरपालिकेने या जागांबाबतच्या अटी-शर्ती आणि जमिनींच्या मोबदल्याचे पर्याय पीएमआरडीएकडे सादर केले असून, त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे. मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळांसाठी एकूण २० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पाच ठिकाणी वाहनतळे बांधून पूर्ण झाली असून उर्वरित जागांची प्रक्रिया सुरू आहे. खासगी जमीनमालकांशीही यासंदर्भात चर्चा सुरू असली, तरी महापालिका आणि सरकारी जागांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
महापालिकेने आरक्षित केलेल्या पार्किंग भूखंडांची स्थितीही चिंताजनक आहे. एकूण १३७ पैकी केवळ ३१ भूखंड विकसित झाले असून १०६ भूखंड अद्याप कागदावरच आहेत.
Leave a Reply