अनेक घरांमध्ये आजीच्या जुन्या साड्या आठवणी म्हणून कपाटात जपून ठेवल्या जातात. त्या साड्या आता कोणी नेसत नाही, पण त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी मात्र कायम राहतात. याच जुन्या साड्यांमधील आठवणी आणि पारंपरिक विणकाम यांना व्यवसायाची संधी बनवण्याचा विचार पूजा नादिग आणि शशांक शिवरापूरापू या जोडप्याला सुचला. दोघांनीही आपापल्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या आणि बचतीतील अवघ्या तीन लाख रुपयांतून साड्यांचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या ‘नेरिगे स्टोरी’ या ब्रँडची मासिक उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ‘नेरिगे’ या शब्दाचा अर्थ साड्यांच्या निर्या असा आहे.
नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय
पूजा नादिग या टीसीएसमध्ये सुमारे पाच वर्षे सॉफ्टवेअर टेस्टिंगचे काम करत होत्या. शशांक यांनी एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर विक्री आणि स्टार्टअप क्षेत्रात काम केले होते. दोघांचेही करिअर व्यवस्थित सुरू होते. मात्र पूजांना स्वतःची साडीची कंपनी सुरू करायची होती. २०१९ च्या अखेरीस त्यांनी ही सविस्तर कल्पना शशांक यांच्यासमोर मांडली. २०२० मधील लॉकडाऊनच्या काळात दोघांनाही आपल्या करिअरबद्दल नव्याने विचार करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
तीन लाख रुपयांत व्यवसायाची सुरुवात
या जोडप्याच्या कुटुंबात व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे सुरुवातीला अनेक गोष्टी त्यांना शिकाव्या लागल्या. त्यांनी आपल्या बचतीतील तीन लाख रुपये व्यवसायासाठी गुंतवले. सुरुवातीच्या काळात पूजा स्वतः साड्यांचे मॉडेलिंग करत असत, तर शशांक छायाचित्रण आणि व्हिडिओ करण्याची जबाबदारी सांभाळायचे. व्यवसायासाठी आणखी पैसे जमा करता यावेत यासाठी पूजांनी झुंबा प्रशिक्षक म्हणूनही काम केले. तर शशांक यांनी विणकर, कारागीर आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित लोकांकडून साड्यांबद्दल माहिती घेतली.
६० हजारांहून अधिक ग्राहक, महिन्याला एक कोटींची उलाढाल
२०२१ मध्ये या व्यवसायाने सुमारे ३० लाख रुपयांचा वार्षिक फायदा मिळवला. त्यानंतर ब्रँडचा विस्तार होत गेला. २०२५ पर्यंत कंपनीची मासिक महसूल क्षमता एक कोटी रुपयांपर्यंत गेली. आतापर्यंत या ब्रँडने ६० हजारांहून अधिक ग्राहक जोडले आहेत. तसेच या साड्या विदेशातही जातात. या ब्रँडचे वैशिष्ट्य म्हणजे १९५० च्या दशकातील साध्या, आकर्षक आणि पारंपरिक शैलीतील साड्यांचा संग्रह. आधुनिक साड्यांच्या बाजारात जुन्या काळातील रंगसंगती, कापड आणि डिझाइन पुन्हा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
Leave a Reply