राज्यात यंदा मान्सूनच्या पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि संपूर्ण जुलै महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. मात्र त्यानंतर राज्यात पाऊसच झाला नाही. पावसाअभावी राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पाण्याची मोठी टंचाई जाणवत असून अनेक प्रकल्पांमधील पाणीपातळी खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. दुष्काळातही मुंबईकरांना पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही.
## बैठकीत कोणता निर्णय झाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. पिण्यासाठी 81 टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली. पाणी आरक्षित करण्याचा निर्णय झाला असला तरी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही महाजन यांनी केले आहे.
## मुंबई महानगर क्षेत्रातील पाणीसाठा
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एकूण 24 प्रकल्प आहेत. या 24 प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 103 टीएमसी एवढी आहे. त्यापैकी 81 टीएमसी पाणी आता पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित झाले आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता नवीन 12 प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्रस्तावित आहेत. यामध्ये जलसंपदा विभागाचे 9, मुंबई महापालिकेचे 2 आणि सिडको विभागाचा 1 प्रकल्प आहे. या प्रकल्पांमधून सुमारे 80 टीएमसी पाणी नव्याने उपलब्ध होणार आहे.
नवीन प्रकल्पांमध्ये महापालिकेकडील पिंजाळ 14 टीएमसी आणि गारगाई 8 टीएमसी यांचा समावेश आहे. जलसंपदा विभागाचे शाई 12 टीएमसी, काळू 14 टीएमसी, बाळगंगा 6 टीएमसी, कोंढाणे 4 टीएमसी, पोशीर 10 टीएमसी आणि शेलार 6 टीएमसी असे प्रकल्प आहेत. याशिवाय खोलसापाडा, देहरजी आणि सुसरी या प्रकल्पांमधून 6 टीएमसी पाणी मिळणार आहे. सरकारने 81 टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Leave a Reply