वास्तुशास्त्रात घरातील स्वयंपाकघराला विशेष महत्त्व दिले जाते, कारण याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार केले जाते. आपण खात असलेल्या अन्नाचा परिणाम आपल्या आरोग्यावर, विचारांवर आणि ऊर्जेवर होतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे स्वयंपाकघराची रचना योग्य असणे महत्त्वाचे मानले जाते. स्वयंपाकघरात वास्तुदोष असल्यास घरात तणाव, आजारपण आणि पैशांच्या अडचणी वाढू शकतात, असे सांगितले जाते. अनेकदा स्वयंपाकघर तयार करताना सिंक चुकीच्या ठिकाणी बसवले जाते. भाजी धुण्यापासून ते भांडी स्वच्छ करण्यापर्यंत अनेक कामांसाठी सिंकचा वापर होतो, त्यामुळे सिंक नेमके कोणत्या दिशेला असावे, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
सिंक कोणत्या दिशेला असावे?
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील सिंक ईशान्य दिशेला, म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्या मधल्या कोपऱ्यात असावे. या दिशेला सिंक ठेवल्याने घरात सुख आणि समृद्धी येते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे सिंकचा नळ आणि भांडी धुताना आपले तोंड उत्तर दिशेला असेल, याची काळजी घ्यावी. भांडी धुताना तोंड उत्तर दिशेला असणे योग्य मानले जाते. याउलट घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला, म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात स्वयंपाकघरातील सिंक ठेवू नये. या दिशेला सिंक असल्यास घरातील लोकांमध्ये वाद होऊ शकतात आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.
कोणत्या चुका टाळाव्यात?
स्वयंपाकघरात गॅसची शेगडी आणि सिंक एकमेकांच्या अगदी जवळ नसावेत. वास्तुशास्त्रानुसार शेगडीचा संबंध अग्नी तत्त्वाशी, तर सिंकचा संबंध जल तत्त्वाशी आहे. ही दोन्ही तत्त्वे एकमेकांच्या विरुद्ध मानली जातात, त्यामुळे शेगडी आणि सिंक जवळ असल्यास घरातील आनंदावर परिणाम होऊ शकतो. सिंकखाली कचरापेटी ठेवणेही टाळावे आणि त्या ठिकाणी कचरा साचू देऊ नये, कारण त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते, असे मानले जाते. याशिवाय सिंक अशा ठिकाणी असावे, जिथून घरातील बसण्याची जागा दिसणार नाही. सिंकचा नळ नेहमी व्यवस्थित असावा; नळातून सतत पाणी गळत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच दुरुस्ती करावी. ही माहिती वास्तुशास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे.
Leave a Reply