वरण, आमटी, भाजी किंवा डाळीला लाल मिरचीची फोडणी दिली की पदार्थाची चव आणखी वाढते. बाजारात वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या लाल मिरच्या पाहायला मिळतात. त्यामध्ये लांब लाल मिरची आणि गोल लाल मिरची या दोन प्रकारांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या दोन्ही मिरच्यांच्या चवीमध्ये आणि तिखटपणामध्ये मोठा फरक असतो. काही मिरच्या पदार्थाला सुंदर लाल रंग देतात, तर काही पदार्थाची तिखट चव वाढवतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी मिरचीचा प्रकार ओळखणे महत्त्वाचे ठरते.
लांब मिरचीचे प्रकार आणि वापर
काश्मिरी लाल मिरची ही लांब आणि वाळलेली असते. पदार्थांना आकर्षक लाल रंग देण्यासाठी तिचा वापर केला जातो. तिचा तिखटपणा तुलनेने कमी असतो आणि तिच्यामध्ये स्मोकी चव असते. त्यामुळे फोडणी, ग्रेव्ही आणि चटणीसाठी ही मिरची उत्तम मानली जाते. आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरची तिच्या तिखटपणासाठी प्रसिद्ध आहे. ही मिरची लांब, लाल आणि तिखट असते. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये तसेच मसाले तयार करण्यासाठी तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कर्नाटकातील ब्याडगी मिरची दिसायला लांब आणि सुरकुत्या असलेली असते. तिचा रंग गडद लाल असतो. पदार्थांना आकर्षक रंग आणि विशेष चव देण्यासाठी तिचा वापर केला जातो. चटणी आणि मसाल्यांमध्येही ही मिरची वापरली जाते.
गोल मिरची आणि फोडणीसाठी निवड
गोल लाल मिरच्यांना चेरी चिली असेही म्हणतात. त्या आकाराने लहान, गोलसर आणि गडद लाल रंगाच्या असतात. सामान्यतः या मिरच्या सौम्य तिखटपणासाठी ओळखल्या जातात. फोडणी, सँडविच आणि लोणचे तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. गोल लाल मिरची दिसायला पिमेंटो मिरचीसारखी असल्यामुळे अनेकदा दोन्हींची गल्लत होते. मात्र, त्यांचे प्रकार आणि चवीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असू शकतात. ईशान्येकडील आसाम, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये भूत जोलोकिया ही मिरची आढळते. तिला घोस्ट पेपर असेही म्हणतात. आकाराने लहान असली तरी तिचा तिखटपणा अत्यंत तीव्र असतो. २००७ मध्ये या मिरचीने जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले होते. पदार्थाला आकर्षक लाल रंग द्यायचा असेल, तर काश्मिरी किंवा ब्याडगी मिरची वापरता येते. अधिक तिखट चव हवी असल्यास गुंटूर मिरची योग्य ठरते. तर सौम्य तिखटपणासाठी चेरी मिरची वापरता येते. त्यामुळे पदार्थाची चव आणि आवडीनुसार मिरचीची निवड करणे महत्त्वाचे आहे.
Leave a Reply