शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

चंद्रपूर: बालसुधारगृहातून ६ मुलींचे पलायन

चंद्रपूरच्या बालसुधारगृहातून सहा मुलींनी रक्षकाला धमकावून पलायन केले. पोलिसांनी ३५ कॅमेरे तपासून उशिरा त्यांना हिंगणघाट रेल्वे स्थानकाजवळ ताब्यात घेतले.

चंद्रपूर: बालसुधारगृहातून ६ मुलींचे पलायन

चंद्रपूर शहरातील बालसुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मुलींचा शोध सुरू केला आणि रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

काचेचा ग्लास फोडून रक्षकाला धमकी

चंद्रपूर शहरातील बालसुधारगृहात हा प्रकार घडला. या बालसुधारगृहामध्ये समुपदेशनासाठी असलेल्या एका मुलीने काचेचा ग्लास फोडून सुरक्षा रक्षकाला धमकावले आणि आपल्यासह सहा अल्पवयीन मुलींना भिंतीवरून उडी मारून पळून जाण्यास मदत केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली.

३५ कॅमेरे तपासून शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मुलींचा शोध सुरू केला. चंद्रपूर शहराच्या आसपासची रेल्वे स्थानके, बस स्टँड, मंदिरे आणि नदीकाठ अशा सर्वच ठिकाणी शोध घेण्यात आला. तपासकामी शहर व आसपासचे ३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. याशिवाय सायबर शोध मोहीम आणि गोपनीय माहितीसह प्रत्यक्षदर्शींचीही मदत घेण्यात आली. तपासासाठी एकूण सहा विविध पथके तयार करण्यात आली होती.

शेवटी रात्री उशिरा सहा मुली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट रेल्वे स्थानकाजवळ असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हिंगणघाट पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यानंतर चंद्रपूर येथून दोन पोलिसांची पथके हिंगणघाटला रवाना करण्यात आली आणि चंद्रपूर पोलिसांनी मुलींना आपल्या ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलींनी सुरक्षा रक्षकाला धमकावून बालसुधारगृहातून पलायन केल्याने हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा बालसुधारगृहातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance