रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ च्या सलामीच्या सामन्यात भारत ‘अ’ संघाने नेपाळवर ३०६ धावांनी मोठा विजय मिळवला. या एकतर्फी विजयामुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो निर्णय त्यांना अखेर महागात पडला.
तिलक-कुशाग्रची शतके; भारताने उभारल्या ३३२ धावा
प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून ३३२ धावा केल्या. डावाच्या सुरुवातीलाच भारताने अवघ्या ४२ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि आयुष बडोनी स्वस्तात बाद झाल्याने संघावर मोठा दबाव आला होता. त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज कुमार कुशाग्र यांनी डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी रचली. कुशाग्रने १०२ चेंडूंमध्ये ११७ धावा केल्या, तर तिलकने ११३ चेंडूंमध्ये १०७ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये सूर्यांश शेडगेने अवघ्या १४ चेंडूंमध्ये ३६ धावा फटकावून डावाला अंतिम आकार दिला.
नेपाळचा डाव २६ धावांत गुंडाळला
३३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या एका धावेत त्यांनी पहिल्या चार विकेट गमावल्या. त्यानंतरही संघ सावरू शकला नाही आणि ठराविक अंतराने विकेट गमावत नेपाळचा संघ केवळ २६ धावांत सर्वबाद झाला. वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांनी नेपाळच्या फलंदाजीची फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या दोघांच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळी फलंदाज पूर्णपणे हतबल झाले आणि भारताने ३०६ धावांनी संस्मरणीय विजय नोंदवला.
Leave a Reply