पुण्यातील कोंढवा येथील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलमध्ये झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मयंक चुलेट याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा आर्यन्स बुद्धिबळ अकादमीने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली होती. स्वर्गीय भारतबाई हलकुडे यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत १७०० पेक्षा कमी रेटिंग असलेले खेळाडू सहभागी झाले होते.
अंतिम, म्हणजे नवव्या फेरीत मयंकने श्रद्धा पाडवेकर यांचा पराभव केला आणि एकूण ८ गुणांसह निर्विवाद विजेता ठरला. प्रद्युम्न मिश्रा याने सोहम लांगोरे याच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवत ७.५ गुण मिळवले आणि ५४.५ बुकोल्झ कट गुणांच्या आधारे दुसरे स्थान मिळवले. कर्नाटकचा समर्थ चौगुले याने लव्य अग्रवाल याच्याशी बरोबरी साधत ७.५ गुण मिळवले; ५१.५ बुकोल्झ कट गुणांमुळे तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
पारितोषिक वितरण
विजेत्यांना करंडक आणि रोख पारितोषिके देण्यात आली. मयंक चुलेट याला करंडकासह ६० हजार रुपये, प्रद्युम्न मिश्रा याला करंडकासह ४० हजार रुपये, तर समर्थ चौगुले याला करंडकासह २० हजार रुपये मिळाले. दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेले ज्येष्ठ बुद्धिबळपटू जयंत गोखले यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण झाले.
पारितोषिक वितरणावेळी आयोजन समितीच्या अध्यक्षा वंदना हलकुडे, आयोजन सचिव नागनाथ हलकुडे, स्पर्धा संचालक योगेश महामुनी, प्राचार्या वर्षा कोकिळ, मुख्य पंच आयए नितीन शेणवी, उपमुख्य पंच आयए आम्रीश तल्लू यांच्यासह राजेंद्र माने, मॅनवेल दास आणि मदन जुनेजा उपस्थित होते.
Leave a Reply