महाराष्ट्रातील ३१० दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
उत्पन्न मर्यादेची अट शिथिल, एसईबीसी-ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना लाभ
या निर्णयानुसार वार्षिक आठ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न मर्यादेची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेणे शक्य होणार आहे. विशेषतः एसईबीसी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आणि ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पात्र विद्यार्थ्यांना या शुल्क माफीचा फायदा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा, वैद्यकीय शिक्षणात समानतेचा प्रयत्न
राज्यभरातील दुष्काळग्रस्त भागांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक भारामुळे त्यांना आपले शिक्षण थांबवावे लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबे आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारच्या या पावलामुळे वैद्यकीय शिक्षणात समानता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Leave a Reply