नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरी राज्यात अपेक्षित गुलाबी थंडीचा जोर अद्याप जाणवत नाही. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत असून, कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ घोंघावत आहे. त्याचबरोबर आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालींचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याने तापमानात सातत्याने बदल जाणवत आहेत.
किमान तापमानात घट, कमाल तापमानात वाढ
गुरुवारी राज्यातील किमान तापमानाची नोंद पाहता धुळे येथे सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. यवतमाळमध्ये ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया, जेऊर, जळगाव आणि वर्धा येथे पारा १३ अंशांच्या खाली राहिला. पुणे, महाबळेश्वर, निफाड आणि नागपूर येथेही किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविण्यात आले.
दरम्यान, राज्यातील कमाल तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रूझ येथे ३५ अंश सेल्सिअस तापमान होते. डहाणू, जळगाव आणि सोलापूर येथेही कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांच्या पुढे राहिला.
आज अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता
नोव्हेंबर महिना सुरू असतानाही राज्यात अपेक्षित थंडीचा जोर जाणवत नसल्याचे चित्र आहे. राज्यात आज अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, तापमानातील चढ-उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना गुलाबी थंडीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
Leave a Reply