गोरगरीब कुटुंबांना मोफत आणि स्वस्त दरात धान्य मिळावे, यासाठी शासनाकडून रेशन व्यवस्थेचा दावा केला जातो. मात्र लातूर जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून लाभार्थ्यांच्या वाट्याला येणाऱ्या धान्याचा दर्जा पाहता हा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. दुकानांमधून वाटप केले जाणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून, ते खाण्यायोग्य तरी आहे का, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
विदर्भातील धान्य मराठवाड्याच्या माथी
विदर्भातील गोंदियातून आलेला तांदूळ आणि यवतमाळमधून आलेली हायब्रीड ज्वारी लातूर जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये वितरित केली जात आहे. या तांदळावर जाळ्यासारखा बुरशीचा थर दिसून येतो, तर तांदळात अळ्या आढळत आहेत. ज्वारीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. काही ठिकाणी तर ज्वारी अक्षरशः पीठ होऊन गेली आहे. असे धान्य लाभार्थ्यांच्या माथी मारले जात असल्याची तक्रार आहे.
दिवाळीपासून संताप कायम
ऐन दिवाळीच्या काळात आणि त्यानंतरही लाभार्थ्यांना असेच निकृष्ट धान्य दिले जात असल्याने त्यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. सणाच्या दिवसांत तरी चांगल्या दर्जाचे धान्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली. रोजच्या जेवणासाठी हेच धान्य वापरावे लागत असल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत.
तपासणीची जबाबदारी कोणाची?
रेशनवरील धान्याच्या दर्जाची तपासणी भारतीय अन्न महामंडळाकडून केली जाते. असे असतानाही निकृष्ट धान्य दुकानांपर्यंत कसे पोहोचते, हा प्रश्न उपस्थित होत आहे. लाभार्थ्यांना दर्जेदार धान्य मिळावे, यासाठी तपासणी अधिक कडक करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Leave a Reply