महाराष्ट्रात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात १३ जागा जिंकल्यानंतर, काँग्रेसने २०२९ च्या निवडणुकीची तयारी आधीच सुरू केली आहे. पुढच्या निवडणुकीला अजून अडीच वर्षांहून अधिक काळ बाकी असला, तरी पक्षाने आतापासूनच राज्यातील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची पुण्यात महाबैठक होणार असून येथे लोकसभेसाठी रणनीती आखली जाणार आहे.
पुण्यातील बैठकीत कोण उपस्थित राहणार?
पुण्यात होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी श्रीवेल्ला प्रसाद आणि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बंटी पाटील, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेते, सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रभारी उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये उद्या दुपारी बारा वाजता ही बैठक पार पडणार आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत एका धोरणात्मक आराखड्यानुसार काम करणार आहे. यासाठी बूथ स्तरापर्यंतची योजना तयार करण्यात आली आहे. या बैठकीचा अहवाल थेट दिल्लीतील हायकमांड म्हणजेच राहुल गांधींकडे पाठवला जाणार आहे.
४८ मतदारसंघांसाठी ‘कनेक्ट सेंटर’
महाराष्ट्र राज्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रभारी डॉ. श्रीवेल्ला प्रसाद यांनी पक्षाच्या या योजनेबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष एक विशेष ‘कनेक्ट सेंटर’ (संपर्क केंद्र) उभारणार आहे. जिल्हा पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. ही ‘कनेक्ट सेंटर्स’ बूथ-स्तरीय कार्यकर्ते आणि राज्य नेतृत्व यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करण्याचे काम करतील. यासह त्यांचा वापर तळागाळातील पक्षाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आणि संघटनात्मक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी केला जाणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ‘कनेक्ट सेंटर’मध्ये किमान १६ डेस्क उभारले जातील. प्रत्येक डेस्कवर तीन लोकसभा मतदारसंघांची किंवा १८ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे.
काय कामे केली जातील?
महाराष्ट्र काँग्रेसच्या या उपक्रमाचा उद्देश तळागाळातील घडामोडींवर लक्ष ठेवणे हा आहे. ‘कनेक्ट सेंटर’ केवळ पक्ष कार्यकर्त्यांकडून अभिप्राय गोळा करण्यापुरते किंवा संघटनात्मक संवाद सुलभ करण्यापुरते मर्यादित नसेल, तर ते राज्य समितीसोबत समन्वय राखण्याचे कामही करणार आहे. यासह या उपक्रमामध्ये मतदार याद्यांची पडताळणी, आंदोलनांचे आयोजन, स्थानिक समित्यांची स्थापना आणि विशिष्ट राजकीय मोहिमांची अंमलबजावणी यांसारख्या कामांचा समावेश असणार आहे. जे पक्षकार्यकर्ते दीर्घकाळापासून पक्षाशी संबंधित आहेत परंतु सध्या निष्क्रिय आहेत, त्यांच्याशी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून संपर्क साधला जाणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या ‘शक्ती’ कार्यक्रमांतर्गत गोळा केलेली सदस्यत्व नोंदणी आणि माहिती वापरली जाणार आहे. निष्क्रिय जिल्हाध्यक्षांवर कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Leave a Reply