पारगाव: अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या दिवाळी बोनस वितरणात महिला शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. पहिल्या पाचही क्रमांकांवर महिलांनी नाव कोरले आहे. सुजाता शशिकांत टाव्हरे यांना सर्वाधिक ६९ हजार ५५० रुपये बोनस मिळाला आहे. संस्थेच्या सर्व सभासदांना एकूण १० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
पहिल्या पाच महिला
बोनस मिळवणाऱ्या प्रथम पाच महिला पुढीलप्रमाणे: सुजाता शशिकांत टाव्हरे – ६९,५५० रुपये; सीमा संदेश हिंगे पाटील – ५७,५८२ रुपये; शीतल संदेश टाव्हरे – ५२,५९५ रुपये; सुरेखा हनुमंत वाघ – ४८,०५७ रुपये; सुनिता संभाजी हिंगे पाटील – ४३,३९५ रुपये. भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम बाप्पू हिंगे, सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे यांच्या हस्ते हे वाटप झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संभाजी हिंगे पाटील, उपाध्यक्ष हनुमंत वाघ, सचिव विकास हिंगे व संचालक उपस्थित होते.
दररोजची मेहनत, आर्थिक स्वावलंबन
ग्रामीण भागातील महिला दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करत असल्याचे या यशातून दिसून आले. महिला शेतकऱ्यांना तब्बल ७० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळाल्याने त्यांच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. पुणे (कात्रज) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेचे संचालक विष्णू काका हिंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी संस्था दूध उत्पादकांना दिवाळी बोनसचे वाटप करते. यावर्षी तब्बल १० लाख रुपयांचा बोनस वाटप करण्यात आला. त्यामध्ये संस्थेच्या वतीने एक रुपया पन्नास पैसे व पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने एक रुपया, अशा प्रकारे प्रतिलिटर दोन रुपये पन्नास पैसे बोनस वाटप करण्यात आला.
Leave a Reply