शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण आणि सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली आहे. अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे बरेचसे नेते उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्या पुतळ्यासमोर बसूनच निर्णय घ्यावा, असा टोला ठाकरे यांनी लगावला. शरद पवार यांच्या पक्षात या मुद्यावर संभ्रमावस्था दिसून येत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
रोहित पवारांच्या आरोपांवर ठाकरेंची भूमिका
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘मफलर मॅन’ कोण, याचा उलगडा केला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत फडणवीस हे व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, एकूण घटनाक्रम पाहिला तर व्हीएसआर कंपनीवर कारवाई झालेली दिसत नाही. रोहित पवार जे म्हणत आहेत, त्यात काही वावगे आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. त्यांच्याकडे पुरावे असतील तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा फोन उचलावा, असेही ठाकरे म्हणाले.
सीमांकनावरही स्पष्टता नाही
मतदारसंघांच्या सीमांकनाबद्दलही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्पष्टता नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत, आपले मत विचारले तर आपण ते मांडू, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा वातावरण तापले असून, ठाकरेंच्या या टिप्पणीमुळे चर्चेला नवा रंग चढला आहे.
Leave a Reply