२६ नोव्हेंबरच्या हल्ल्याला १७ वर्षे झाली आहेत. मात्र आजही २६ नोव्हेंबर हा दिवस उजाडला की, मुंबईवर हल्ला करून अवघ्या देशाला वेठीस धरणाऱ्या त्या काळ्या दिवसाच्या आठवणी ताज्या होतात. शत्रू राष्ट्राने केलेल्या त्या भयानक हल्ल्यानंतर पूर्ण मुंबई हादरली होती. या हल्ल्यात अनेकांनी प्राण गमावले. ही घटना कधीच विसरता येण्यासारखी नाही. मुंबईच्या काळजात आजही हल्ल्याच्या त्या जखमा भळभळत आहेत, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
कराचीच्या नियंत्रण कक्षात काय घडले
या भयानक घटनेवर आधारित अनेक चित्रपट साकारण्यात आले. पण कोणत्याच चित्रपटातून एक सत्य जगासमोर आले नाही, असे निकम म्हणाले. एका मुलाखतीत त्यांनी २६/११ च्या रात्री कराचीच्या नियंत्रण कक्षात नेमके काय घडले, याबद्दल सांगितले.
निकम यांच्या सांगण्यानुसार, कराची येथील नियंत्रण कक्षात चार ते पाच लोक बसलेले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ती चार ते पाच लोक थेट हल्लेखोरांसोबत बोलत होते आणि हल्लेखोर दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील लोकांशी बोलत होते.
हिंदी शिकवणारा कोण होता
त्यांच्यामध्ये जे दहा हल्लेखोर होते, ते पंजाबी मुस्लीम होते, पण त्यांना हिंदी भाषा नीट बोलता येत नव्हती. अशात त्यांना कराची येथून सांगण्यात येत होते की, असं तुम्ही हिंदी बोला. ते हल्लेखोर सर्व काही लिहून घेत होते, असे निकम म्हणाले.
ते सर्व हल्लेखोर सर्व काही लिहून घेत होते, पण तेथून सांगणारा स्पष्ट हिंदी बोलू शकत होता. तो हिंदी भाषेत बोलणारा भारतीय होता. एवढेच नाही, तर तो हिंदी बोलणारा महाराष्ट्रातला होता आणि हेच सत्य आहे, असा दावा निकम यांनी केला.
२६/११ हल्ल्याविरोधात उज्ज्वल निकम यांनीच न्यायालयात बाजू मांडली होती. त्यामुळे त्यांच्या या दाव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Leave a Reply