मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सपकाळांचा शाह यांच्यावर आरोप; कायदा-सुव्यवस्था रसातळाला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कायदा-सुव्यवस्थेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

सपकाळांचा शाह यांच्यावर आरोप; कायदा-सुव्यवस्था रसातळाला

राज्यातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली असून माफिया खुलेआम धमक्या देत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

बॉलिवूड कलाकारांच्या घरासमोर जाण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे, असे सपकाळ म्हणाले. गुजरातच्या जेलमधूनच माफिया राज चालवले जात असून केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. गुंडांच्या खुल्या धमक्या येत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात काय करत आहेत, असा संतप्त प्रश्नही त्यांनी विचारला.

बॉलिवूडमधील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांना धमक्या दिल्या जात आहेत, तसेच त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत, असे सपकाळ म्हणाले. अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर आता अभिनेते अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले जात आहे. हल्ल्याच्या भीतीमुळे अमिताभ बच्चन बुलेटप्रुफ काचेमागून चाहत्यांना भेटत आहेत, ही परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल, असा दावा सरकारने केला होता, पण दहशतवाद व गुंडगिरी अधिक जोमाने फोफावली आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला. काँग्रेस सरकार असताना अभिनेते खुलेआम फिरत होते, आज तशी परिस्थिती राहिली नाही, असे ते म्हणाले.

डिलिमिटेशन विधेयकाला विरोध

डिलिमिटेशन विधेयकामुळे खासदारांची संख्या ५५० वरून ८५० पर्यंत वाढणार आहे. पण लोकप्रतिनिधींची संख्याच वाढवायची असेल तर फक्त खासदारांची संख्या का वाढवता, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचीही संख्या वाढवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या विधेयकाला काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीचा पहिल्यापासूनच विरोध आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (श.प.) खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली तरी इंडिया आघाडीचा विरोध कायम आहे, असे सपकाळ म्हणाले.

रोहित पठारे हत्या प्रकरणावर प्रश्न

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये रोहित पठारे या तरुणाची हत्या संताप आणणारी असल्याचे सपकाळ म्हणाले. या प्रकरणी पोलीस तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केली, त्यांची ओळख परेड कुटुंबीयांसमोर केली नाही. उलट रोहित पठारे यांच्या कुटुंबालाही धमक्या येत आहेत, असा आरोप त्यांनी केला. राज्यात अशा प्रकारच्या हत्या होत असताना गृहमंत्री पदावर राहण्याचा देवेंद्र फडणवीस यांना अधिकार नाही, असे सपकाळ म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी यांच्यामुळे भारताची जगात बदनामी होत नाही, तर मोदी सरकारच्या मंत्र्याचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्याने बदनामी होत आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि न्यायाधीश यांच्या फोनमध्ये पेगॅसेस स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी केल्यामुळे, विरोधी पक्षनेते संसदेत बोलत असताना त्यांचा माईक बंद केल्यामुळे, तसेच महागाई, बेरोजगारी आणि हंगर इंडेक्समुळे भारताची जगात बदनामी होत आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी समाजातील विविध घटकांना भेटतात — हमाल, मॅकेनिक, शेतकरी, विद्यार्थी आणि पीडित यांच्याशी संवाद साधतात. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४५०० किलोमीटरची पदयात्रा काढून सर्वांशी संवाद साधला आहे. आता गरज अमित शाह यांनी सुरक्षा बाजूला सारून जनतेत मिसळण्याची आहे, असेही सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महाराष्ट्र एनएसयूआयने ‘शिक्षण वाचवू, पर्यावरण वाचवू, लोकशाही वाचवू’ या अभियानाची सुरुवात केली. झाडे जगवा, पर्यावरण वाचवा यासह शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात एनएसयूआय राज्यभर हे आंदोलन करणार आहे. या अधिवेशनात विधिमंडळात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार वजाहत मिर्झा, राहुल बोंद्रे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आदी उपस्थित होते.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance